Breaking News

मुंबईचा विजयाचा ‘चौकार’

हैदराबाद : वृत्तसंस्था

आयपीएलच्या 12 व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करून आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. हैदराबादच्या रणांगणातल्या या सामन्यात मुंबईने चेन्नईला विजयासाठी 150 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईचा संघ केवळ 148 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

शेन वॉटसनने तीन जीवदानांचा लाभ उठवून 80 धावांची तुफानी खेळी केली आणि चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. सामना संपायला दोन चेंडू असताना वॉटसन धावचीत झाला आणि सामन्याला पुन्हा कलाटणी मिळाली. चेन्नईला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर केवळ दोन धावांची आवश्यकता होती. लसिथ मलिंगाने त्या चेंडूवर शार्दूल ठाकूरला पायचित करून, मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना मुंबईला 20 षटकांत 8 बाद 149 धावांचीच मजल मारता आली. हैदराबादमधल्या या सामन्यात क्विन्टन डी कॉक आणि रोहित शर्माने मुंबईला पाच षटकांत 45 धावांची सलामी दिली होती. शार्दूल ठाकूरने डी कॉकला माघारी धाडून ही जोडी फोडली आणि मुंबईच्या डावाला घरघर सुरू झाली. मुंबईची एक बाद 45 धावांवरून 15 षटकांत पाच बाद 102 अशी घसरगुंडी उडाली. त्या परिस्थितीत कायरन पोलार्डने 25 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 41 धावांची खेळी उभारून मुंबईच्या डावाला आकार दिला.

धोनी बाद होणं मुंबईसाठी टर्निंग पॉईंट -सचिन तेंडुलकर

महेंद्रसिंह धोनी धावचीत होणं हे चेन्नईच्या पराभवाचं महत्त्वाचं कारण असल्याचं सचिन म्हणाला. चेन्नईच्या डावाच्या तेराव्या षटकात धोनी दोन धावा करुन बाद झाला. ईशान किशनच्या थ्रोवर धोनी धावचीत झाला. धोनीने ओव्हर थ्रोवर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण ईशान किशनने थेट स्टंपवर निशाणा साधला आणि धोनी पॅव्हेलियनमध्ये परतला. धोनी बाद झाला आणि सामना फिरला, असं सचिनने सांगितलं.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply