अलिबाग ः प्रतिनिधी
पाणी बचतीचे महत्त्व घरोघरी पोहचविण्यासाठी गावागावांत विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सोमवारी (दि. 22) जलदिनानिमित्त आयाजित कार्यक्रमात केले.
रायगड जिल्हा परिषद, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातर्फे सोमवारी जिल्हा परिषदेच्या सुरबा नाना टिपणीस सभागृहात डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थितीत जागतिक जलदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, कृषी अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बंकट आर्ले, नेहरू युवा केंद्र जिल्हा समन्वयक निशांत रौतेला यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील काही भागांत पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुका स्तरावर गटविकास अधिकार्यांनी योग्य नियोजन करावे. पाणी बचत तसेच टंचाई निवारणासाठी जिल्ह्यात प्रशासनाला सामाजिक संस्थांचे सहकार्य मिळत असून ही चांगली बाब आहे. लोकसहभागातून पाणी स्त्रोत बळकटीकरण तसेच तलावातील गाळ काढण्याची कामे हाती घ्यावीत, असेही डॉ. किरण पाटील यांनी सुचविले.
पाणी वाचवा उपक्रमांतर्गत जलकुंभ सफाई, पाण्याचे प्रदूषण थांबविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना पाणी वाचवा मोहिमेचे महत्त्व पटवून देण्यासाठी शाळांमध्ये मोहीम राबविण्यात यावी, तसेच जलजीवन लोगो स्पर्धा घेऊन नागरिकांपर्यंत पाण्याचे महत्त्व पोहचवावे, असे आवाहन डॉ. ज्ञानदा फणसे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाणी व स्वच्छता विभागाच्या माहिती शिक्षण संवाद सल्लागार नेहा थळे, तर आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम समन्वयक जयवंत गायकवाड यांनी केले. या वेळी लेखक, कवी तुकाराम भिवसेन माने यांच्या शाश्वत स्वच्छतेचा लोकजागर कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच या वेळी उपस्थितांना जलशपथही देण्यात आली.
स्वयंसेवी संस्थांचा सन्मान
पाणीटंचाई निवारणासाठी काम करणार्या स्वयंसेवी संस्थांना प्रमाणपत्र देऊन या वेळी गौरविण्यात आले. यामध्ये माणुसकी प्रतिष्ठान वायशेत, रुरल अॅण्ड यंग फाऊंडेशन, वणांचल समृद्धी अभियान, श्रीया फाऊंडेशन पाले, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था, बांधनवाडी, स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान व जनसेवा प्रतिष्ठान या संस्थांचा समावेश आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper