गव्हाण ः रामप्रहर वृत्त
भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजच्या वतीने प्लास्टिक व थर्माकोलमुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियान राबविण्यात आले.
प्रथम विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली.
विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात इयत्ता सातवी ब च्या विद्यार्थ्यांची भाषणे झाली. विद्यालयाच्या तीन पथकांनी स्वच्छतेचे महत्त्व, प्लास्टिकमुक्ती, कचरा व्यवस्थापन आदी विषयांचे मौलिक संदेश देणारी पथनाट्ये सादर केली. या वेळी केंद्रप्रमुख जोशी, ग्रामसेवक एम. टी. पाटील, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक कांबळे, उपमख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, ज्युनिअर कॉलेज प्रमुख बी. पी. पाटोळे, प्रमोद कोळी, रवींद्र भोईर, प्रा. चौधरी, प्रा. यू. डी. पाटील, प्रा. एम. के. घरत, तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक व शिवाजीनगर, कोपर, गव्हाण येथील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी व अध्यापक उपस्थित होते. प्रास्ताविक देवेंद्र म्हात्रे यांनी केले. सूत्रसंचालन ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले.