पनवेल ः रामप्रहर वृत्त
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन 90 वर्षांपूर्वी देशाच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले. या महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ देश व विदेशात रक्तदान व प्लाझ्मादान शिबिर आयोजित करण्यात आले. त्या अनुषंगाने मंगळवारी (दि. 23) पनवेलच्या खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात रक्त व प्लाझ्मादान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन समारंभास सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे, ‘निफा’चे महाराष्ट्र प्रोजेक्ट डायरेक्टर अमेय पाटील, संवेदना महाराष्ट्रचे आयोजक स्वप्नील जगदाळे, उपप्राचार्य एस. के. पाटील, महाराष्ट्र शिबीर आयोजक चैतन जोशी, प्रवक्ते प्रणव गोवेकर, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ आदी उपस्थित होते.
नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट अॅण्ड अॅक्टिव्हिस्ट्स व महाराष्ट्र इंटरपूनर चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने संवेदना मोहिमेंतर्गत देशभरात 1500हून अधिक रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने सुमारे दीड लाख रक्त युनिट देशाला दान करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील मुख्य शिबिर हे मुख्य आयोजकांच्या सोबतीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, धन्वंतरी आरोग्यदूत सेवा संस्था, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या सहकार्याने खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात झाले.
संपूर्ण देशाला या विषयावर जागरूक करण्यासाठी देशभरातील एक हजारहून अधिक संस्था संवेदना अभियान अंतर्गत जनजागृती मोहीम राबिवित आहेत. या मोहिमेनंतर राष्ट्रीय स्तरावर एक सॉफ्टवेअर आणि मोबाइल अॅपदेखील सुरू करण्यात येणार आहे, ज्यात देशभरातील रक्तदात्यांची माहिती असेल. देशाच्या कोणत्याही भागात जेव्हा रक्त आवश्यक असेल तेव्हा त्याची गरज त्या रक्तगटाच्या रक्तदात्यांमार्फत पूर्ण केली जाणार आहे. या शिबिरात संकलित झालेल्या रक्ताची नोंद गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये सादर केली आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची मोहीम ठरणार आहे.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …