Breaking News

संवाद… कोरोनाबाधित रुग्णांशी!

पनवेल महापालिका हद्दीतील कोरोना रुग्णांना कॉल करून त्यांची माहिती घेण्यासाठी संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या संपर्क कक्षातील शिक्षिकांनी आपुलकीने चौकशी केल्यावर काही रुग्ण ’तुम्ही चांगले काम करता, खूश राहा, सुखी राहा,’ असा आशीर्वाद देत आहेत. महापालिकेच्या या कामाचे ते कौतुकही करीत असल्याचे समजते. पनवेल महापालिका क्षेत्रात 10 मार्च 2020 रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. त्याला आता एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षभरात मधल्या काळात कोरोनाच्या रुग्णवाढीचा आलेख दररोज 300पर्यंत वर जाऊन दररोज 25पर्यंत खाली आला होता, मात्र गेल्या काही दिवसांत पुन्हा रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. महापालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. काही जिल्ह्यांत लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातही जिल्हाधिकार्‍यांनी नवी नियमावली जाहीर केली. यादरम्यान दक्षिण रायगडमध्ये जाण्याचा योग आला. त्या वेळी लंडनहून आलेल्या एका कुटुंबाची माहिती मिळाली. हे कुटुंब लग्नासाठी आले होते. मुंबईला विमानतळावर उतरल्यावर लंडनहून आल्याने साहजिकच त्यांना वेगळे करण्यात आले. महापालिकेच्या गाडीतून क्वारंटाइन करण्यासाठी हॉटेलमध्ये नेण्यात आले. सोबतच्या महापालिका कर्मचार्‍यांनी त्यांना हॉटेलचे भाडे तुम्हालाच द्यावे लागेल आदी माहिती दिली. या कुटुंबाने आम्ही हॉटेलात राहणार नाही असे सांगत श्रीवर्धनला आपल्या नातेवाइकांशी संपर्क साधला. त्यानंतर काही वेळातच सूत्रे हलली. सोबत आलेल्या महापालिकेच्या कर्मचार्‍यांना ठरावीक रक्कम देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर हे कुटुंब कोणतीही टेस्ट न करता आपल्या गावी रवाना झाले. त्यांची कोठेही चौकशी झाली नाही. त्यांनी लग्नालाही हजेरी लावली. आयुक्तसाहेब, असेच प्रकार पनवेलमध्येही घडत आहेत. हॉटेलमध्ये क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती दुपारी आणि रात्री हॉटेलमध्ये असतात. इतर वेळी मैदानावर खेळण्यापासून ते कुटुंबासोबत फिरत असल्याचे अनेक किस्से ऐकायला मिळत आहेत. महापालिका हद्दीत आठवड्यात झालेल्या मोठ्या हळदी कार्यक्रमांवर पोलिसांनी किंवा महापालिका प्रशासनाने कारवाई केल्याचे एकही उदाहरण दिसत नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम फक्त सामान्यांसाठीच का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी गेलो असता दुसर्‍या मजल्यावर काही महिला बसून आपल्या मोबाइलवर बोलून काही माहिती घेऊन आपल्या समोरच्या फाइलमध्ये त्याची नोंद करीत असलेल्या दिसल्या. तिथे असलेले महापालिका शिक्षण विभागाचे समन्वयक अशफाक काझी यांच्याकडे जनाब, हे काय काम सुरू आहे म्हणून चौकशी केली. त्या वेळी या महापालिकेच्या शाळेतील शिक्षिका असून पनवेलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिकेने रुग्णांना मदत करण्यासाठी त्यांची नेमणूक केली आहे. आपल्या महापालिका हद्दीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना रोज फोन करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी करायची. त्यांना काही गरज असल्यास त्याबद्दल माहिती देत असल्याचे समजले. रुग्णांना औषधे मिळाली नसल्यास संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राला व डॉक्टरांना कळवून त्याची माहिती देतात. काही लोक भडकतात की अजून सॅनिटायझरवाले आमच्याकडे आले नाहीत. तेव्हा पनवेलमध्ये रुग्ण वाढत असल्याने उशीर होत असल्याचे त्यांना समजावून सांगतात. रुग्ण, महापालिका आणि डॉक्टर यांच्यात एकप्रकारे समन्वय साधण्याचे काम त्या करीत असल्याचे अशफाक काझी यांनी सांगितले. या ठिकाणी काम करताना त्यांना अनेक बरेवाईट अनुभव येत आहेत. काही जण तुम्ही आमचे कोणीच नसताना आमची काळजी घेत आहात त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतात, तर ज्येष्ठ आशीर्वादही देतात. मौसमी घोडके, कांचन पाटील कामोठे विभागात फोन करून चौकशी करतात. त्या वेळी येथील अनेक रुग्ण मुंबई, नवी मुंबईतील रुग्णालयांत उपचार घेत आहेत. आम्ही त्यांना रोज त्यांची ऑक्सिजन लेव्हल विचारतो आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना घराबाहेर पडू नका, असे सांगण्याचे काम करीत असतो. त्या वेळी काही जण तुम्ही पनवेलहून आम्हाला का फोन करता, आम्ही आराम करायचा की तुमचे फोन घ्यायचे असे विचारतात. एका रुग्णाचे घरातील सदस्य बाहेर गेल्याचे समजल्यावर त्यांना तुम्ही बाहेर जायचे नाही, असे सांगताच त्यांनी हॉस्पिटलचे 50 हजार रुपयांचे बिल आले आहे. तुम्ही जाता का भरायला, असेही विचारले. काही लोक रात्री उशिराही फोन करून माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे मी काय करू, उद्या सेंटर सुरू आहे का, माझा मुलगा दोन वर्षांचा आहे मी काय करू, असेही विचारतात. मग आम्ही त्यांना सांगतो की, आम्ही शिक्षक आहोत. त्यांना डॉक्टरांचा नंबर देऊन त्यांना विचारायला सांगतो.  मी डॉक्टरांकडे जाऊन आलो आहे. त्यांनी मला दोन-तीन दिवसांत रिकव्हर व्हाल, असे सांगितले आहे. तुम्ही आणखी 14 दिवस घरातच राहायचे आहे असे सांगता तुमचे बरोबर आहे. आम्हाला औषधे वेळेवर मिळत नाहीत, मग आम्ही बाहेर नाही गेलो तर औषधे कोण देणार,  आम्ही काय खायचे नाही का? शेजारी आमच्याकडे बघायला तयार नाहीत. त्यांना भीती वाटते की आपल्यालाही कोरोना होईल. वाळीत टाकल्यासारखे झाले आहे. आम्ही बाहेर जायचे नाही, खायचे पण नाही. मला बरा होण्याचा अधिकार नाही का, असे जेव्हा रुग्ण विचारतात तेव्हा त्यांची परिस्थिती ऐकून वाईट वाटत असल्याचे नवीन पनवेलच्या संपर्क कक्षाच्या निलोफर शेख, अनिता पगारे सांगत होत्या. अनेक रुग्ण त्रास होत असला तरी आमचे फोन घेऊन विचारलेली माहिती देतात. एक वर्षापासून लॉकडाऊनमुळे लोक कंटाळली आहेत. त्यात आपल्याला कोरोना झाला  समजल्यावर त्यांची मानसिकता समोरच्याला माहिती देण्याची नसते. त्यामुळे थोडी चिडचिड होते, पण आम्ही ते समजून घेतो. त्यांना काही गरज असल्यास सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना माहिती देतो. या शिक्षिका रोज 70-80 कॉल करून नंतर ऑनलाइन मुलांना शिकवण्याचेही काम करीत आहेत.

आपली ओळख नाही तरी तुम्ही आमच्याशी आपुलकीने बोलता. आमची चौकशी करता. त्यामुळे चांगले वाटते. तुम्ही चांगले काम करीत आहात. खूश राहा, सुखी राहा, असा आशीर्वाद समोरच्यांनी मला दिला. त्या वेळी आपण करीत असलेल्या कामाचा खूप अभिमान वाटला.

-श्वेता मरगज, संपर्क कक्ष, पनवेल

-नितीन देशमुख

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply