गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
पेण ः प्रतिनिधी
वसुली सरकारचा निषेध असो, आघाडी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत पेणमध्ये भाजपतर्फे राज्य सरकारविरोधात पेण न. प.समोरील कोतवाल चौकात निदर्शने करण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, गटनेते अनिरुद्ध पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, कामगार आघाडीचे अध्यक्ष विनोद शहा, नगरसेवक अजय क्षीरसागर, मितेश शहा, महिला मोर्चा अध्यक्ष सुप्रिया चव्हाण, माजी नगरसेवक सुधीर जोशी, रघुनाथ बोरेकर, रवींद्र म्हात्रे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दरमहा 100 कोटी रुपये खंडणी वसुलीचे टार्गेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दिल्याचा गौप्यस्फोट पत्राद्वारे केल्यानंतर संपूर्ण राज्यभर हे प्रकरण गाजत आहे. त्या अनुषंगाने गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत भारतीय जनता पक्षातर्फे करून महाराष्ट्रभर निषेध आंदोलने करण्यात येत आहेत. पेणमध्येही राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
या वेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी सांगितले की, राज्याच्या गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी आम्ही निदर्शने करीत असून संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावण्याचे काम या सरकारने केले आहे. गृहमंत्र्यांविरोधात एका वरिष्ठ
अधिकार्याने गंभीर आरोप केल्यामुळे गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. तिघाडी सरकारमध्ये गेल्या वर्षभरात एकमेकांवर आरोप सुरू असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भ्रष्टाचारात पुढे आहेत. सरकारची ही अवस्था असेल तर सामान्य माणसाला हे सरकार काय न्याय देणार.
राज्यावर कोरोनाचे संकट असताना शैक्षणिक फी माफी, वीज बिल माफी हवी असताना एकीकडे मंत्री वीज तोडणार नाही, अशी आश्वासने देत असून दुसरीकडे विद्युत कर्मचारी सर्रास वीजतोडणी करीत आहेत. अशा प्रकारे सामान्य माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम आघाडीतील नेतेमंडळी करीत आहेत. त्यामुळे पुढील काळात जनता त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असेही प्रीतम पाटील यांनी स्पष्ट केले.
या वेळी भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांनीही आघाडी सरकारचा निषेध करीत आघाडी सरकारमुळे पोलीस खाते बदनाम झाले. या वसुली सरकारमधील गृहमंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा पेणमध्ये आमचे नेते आमदार रविशेठ पाटील व नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरूच राहील, असे बंडू खंडागळे यांनी सांगितले.