पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्तींना महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दाखले देण्यात यावेत, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी रायगड जिल्हा शल्य चिकित्सक व पनवेल मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिकेची स्थापना नव्याने झालेली असून, महानगरपालिका हद्दीतील अनेक दिव्यांग नागरिकांना दिव्यांग दाखले काढूण घेण्यासाठी अलिबाग येथे जावे लागते. यामध्ये त्यांचा वेळ व पैसे दोन्ही खर्च होतात. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये या नागरिकांना महिन्यातून दोन ते तीन दिवस दाखले उपलब्ध करून देण्याची सुविधा दिल्यास त्यांची होणारी गैरसोय टाळणे शक्य होणार आहे. तसेच याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्यासमवेत आवश्यक ती चर्चा करून महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग बांधवांना पनवेल महानगरपालिका क्षेत्रातच दाखले उपलब्ध करून देण्याची कार्यवाही होणे आवश्यक आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग नागरिकांना महानगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंदामार्फत दाखले उपलब्ध करून देणेबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.