Breaking News

भारताचा इंग्लंडसमोर पुन्हा धावांचा डोंगर

राहुलचे शतक,तर विराट-पंत  यांची अर्धशतके

पुणे ः प्रतिनिधी
पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर दणदणीत विजय नोंदवल्यानंतर भारताने शुक्रवारी (दि. 26) इंग्लंडविरुद्ध पुण्यात दुसर्‍या सामन्यात खेळतानाही 336 धावांचा डोंगर उभा केला. के. एल. राहुलचे शतक आणि कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंत अर्धशतकी खेळी केली.  
नाणेफेक गमावलेल्या भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी सलामी दिली. मागील सामन्यात शतकाच्या जवळ पोहोचलेला धवन या सामन्यात फक्त चार धावा काढून बाद झाला. रीस टॉप्लेने त्याला बटलरकरवी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या विराटसोबत रोहितने जम बसवायला सुरुवात केली, मात्र वैयक्तिक 25 धावांवर असताना तो सॅम करनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारताला सांभाळले. या दोघांनी संयमी खेळी करीत 23व्या षटकात भारताचे शतक पूर्ण केले.  त्यानंतर या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांचा टप्पा ओलांडला. भन्नाट फॉर्मात असलेल्या विराटने सलग चौथे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकाचे रुपांतर शतकात करण्यात विराटला पुन्हा अपयश आले. आदिल रशीदने त्याला वैयक्तिक 66 धावांवर तंबूत धाडले.
विराट बाद झाल्यानंतर रिषभ पंत आणि लोकेश राहुलने संघाची धावगती वाढवली. पंतने आक्रमक फलंदाजीचा नजराणा पेश करीत 28 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानंतर राहुलनेही 44व्या षटकात आपल्या शतकाची पायरी ओलांडली. शतक केल्यानंतर राहुलला टॉम करनने माघारी धाडले. राहुलने सात चौकार आणि दोन षटकारांसह 108 धावा ठोकल्या. राहुलनंतर हार्दिक पांड्या आणि पंतने चौफेर फटकेबाजीला सुरुवात केली. वेगवान शतकाकडे कूच करणार्‍या पंतला टॉम करनने बाद करीत इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. पंतने 40 चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांसह 77 धावा फटकावल्या. डावाच्या शेवटच्या षटकात हार्दिक बाद झाला. त्याने 16 चेंडूंत 35 धावा कुटल्या. यात चार षटकार व एका चौकाराचा समावेश होता.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply