तेलंगणा ः वृत्तसंस्था
47व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि मुलींमध्ये हरियाणा यांनी विजेतेपद पटकावले. साईच्या मुलांनी या विजयाबरोबर हॅट्ट्रिक साधली. सूर्यापेठ (तेलंगणा) येथे झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात साईने उत्तर प्रदेशचे आव्हान 51-27 असे सहज परतवून लावत सलग तिसर्या वर्षी या चषकावर आपले नाव कोरले, तर मुलींच्या अंतिम सामन्यात हरियाणाने आपला गतवर्षीचा प्रतिस्पर्धी साईचा प्रतिकार 43-35 असा मोडून काढत सलग दुसर्या वर्षी या चषकावर आपले नाव कोरले.
मुलांमध्ये गतवर्षीदेखील साई आणि उत्तर प्रदेश या दोन संघातच अंतिम लढत झाली होती. साईने सामन्याची सुरुवातच अशी जोरदार केली की पाचव्या मिनिटाला यूपीवर लोण देत 9-1 अशी आघाडी घेतली. 11व्या मिनिटाला पुन्हा लोण देत आपली आघाडी 20-04 अशी भक्कम करीत साईने यूपीच्या गाटातील हवा काढून घेतली. मध्यांतराला 29-12 अशी साईकडे आघाडी होती. उत्तरार्धातील 13व्या मिनिटाला यूपीने लोण देत वाढलेली आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला, पण तो पुरेसा नव्हता. शेवटी 24 गुणांनी साईने सामना अलगद आपल्या नावे केला. साईने मध्यांतरानंतर तीन अव्वल पकडी करीत व मितूने चढाईत गुण घेत संघावर होणारा लोण जवळपास आठ मिनिटे लांबणीवर टाकला. साईकडून मितूने चढाईत 21 गुण घेतले. त्याला सुशीलने चढाईत सहा गुण, जयदीपने पकडीत सात गुण आणि रोहितने पकडीत पाच गुण घेत उत्तम साथ दिली. यूपीकडून रोहित तोमरने चढाईत आठ गुण आणि आकाशने चढाईत सात गुण घेत प्रतिकार करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
मुलींच्या अंतिम सामन्यात सावध सुरुवात करणार्या हरियाणाने 11व्या मिनिटाला साईवर लोण देत 19-10 अशी आघाडी घेतली. मध्यांतरानंतर दुसरा लोण देत आपली आघाडी 34-20 अशी वाढविली. नंतर मात्र साईने जोरदार मुसंडी मारत लोणची परतफेड करीत 36-31 आघाडी कमी केली, पण यातून सावरत हरियाणाने आठ गुणांनी सामना आपल्या नावे केला. हरियाणाच्या विजयात पूजाने धारदार चढाया करीत 20 गुण प्राप्त केले.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper