मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड बाजारपेठ येथील पाडगे डेअरीजवळ असणारा विद्युत पोल व नगर परिषदेची पाण्याची टाकी येथे असणारा पोल नादुरूस्त झाल्याने नागरिकांसाठी धोका निर्माण झाला होता. या ठिकाणी त्वरीत दुरूस्ती करावी, अशी मागणी केली जात होती. याबाबत वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध होताच त्याची दखल महावितरणच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने घेऊन दुरूस्ती काम सुरू करण्यात आले आहे.
वरिष्ठांचे आदेश येताच मुरुड महावितरचे उप मुख्य कार्यकारी अभियंता महादेव दातीर यांनी स्थानिक ठेकेदार माने यांना घेऊन बाजरपेठेतील या दोन पोलवरील दुरूस्ती करण्यासाठी असंख्य कर्मचारी वृंदासह कामास सुरुवात केली. या कामासाठी मुरुड शहरातील पाच तास वीज घालवण्यात आली व हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
शहरातील अनेक ठिकाणी पोलवरील विद्युत वाहिन्यांची तपासणी व्हावी व जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी वीज ग्राहकांकडून करण्यात येत आहे. बाजरपेठेतील दोन पोल वरील काम पूर्ण केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.