Breaking News

‘ती’ गाडी वाझेंच्या ड्रायव्हरने केली होती पार्क; एनआयएचा मोठा खुलासा

मुंबई ः प्रतिनिधी

अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीबद्दल राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठा खुलासा केला आहे. स्फोटके असलेली कार सचिन वाझे यांनी नाही, तर त्यांच्या खासगी चालकाने पार्क केली होती, असे एनआयए तपासातून समोर आल्याचे वृत्त आहे. अंबानी यांच्या घराजवळ आढळलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास सध्या एनआयकडून सुरू आहे. या प्रकरणात एनआयएने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे तत्कालीन प्रमुख सचिन वाझे यांच्यासह काही जणांना अटक केलेली आहे. संशयित आरोपींची चौकशी सुरू असून, दररोज नवनवी माहिती समोर येत आहेत. 25 फेब्रवारी रोजी अंबानी यांच्या अँटिलिया घराजवळ पार्क करण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी सचिन वाझे यांनी नाही, तर त्यांचा खासगी चालकाने पार्क केली होती, तसेच सचिन वाझे पांढर्‍या रंगाची इनोव्हा चालवत होते, अशी माहिती आता एनआयए तपासातून समोर आली आहे. पांढरी स्कॉर्पिओ पार्क करेपर्यंत इनोव्हा तिच्या मागे होती. 17 मार्च रोजी मनसुख हिरेन यांनी मुलूंड-ऐरोली रोडवर स्कॉर्पिओ गाडी पार्क केली होती. त्यानंतर त्याच दिवशी हिरेन हे शहर पोलीस मुख्यालयात आले आणि त्यांनी ऑफिसमध्ये सचिन वाझे यांच्याकडे कारची चावी दिली, असे एनआयएचे म्हणणे आहे. यानंतर सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून त्यांचा खासगी चालक स्कॉर्पिओ उभी करण्यात आलेल्या मुलूंड-ऐरोली रस्त्यावर गेला. वाझेंच्या चालकाने कार सोसायटीत आणली. त्यानंतर 24 फेब्रवारीपर्यंत कार तिथेच उभी होती. 25 फेब्रवारी रोजी चालक ती कार घेऊन दक्षिण मुंबईत गेला आणि अंबानींच्या घराजवळ कार पार्क केली. चालक ज्या वेळी स्कॉर्पिओ घेऊन अँटिलियाच्या दिशेने येत होता, तेव्हा पोलिसांनी गाडी अडवू नये म्हणून वाझे स्कॉर्पिओच्या मागेच होते. रात्री 10 वाजता चालकाने अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली कार पार्क केली. त्यानंतर उतरून तो वाझे चालवत असलेल्या इनोव्हा गाडीत जाऊन बसला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply