Breaking News

विधवा महिलेच्या जमिनीचे पैसे दलालाने लाटले

गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; कर्जत सापेले येथील घटना; आरोपी फरार

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील सापेले गावामधील एका 62 वर्षीय विधवा महिलेच्या जमिनीची विक्री करून दलालाने ते पैसे हडप करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कर्जत पोलिसांनी संबंधीत दलालावर गुन्हा दाखल केला आहे.

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सापेले गावात रतन गंगाराम कोकणे या राहत असून त्यांचे पती 2015 मध्ये वारले आहेत. पतीच्या मृत्यूनंतर गंगाराम कोकणे यांच्या मालकीच्या जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर रतन कोकणे आणि त्यांच्या मुलांची नावे लागली आहेत. नोकरी, धंदा नसल्याने रतन कोकणे यांचा मुलगा उमेश यांनी कडाव वडवली येथील जनार्दन मराडे याच्याकडून काही रक्कम उसनवारी घेतली होती. मात्र उमेश यांना ती रक्कम परत करता आली नाही. त्यामुळे त्यांनी, आमची जमीन विकून द्या आणि त्यातील रक्कम तुम्ही काढून घ्या, असे मरांडे याला सांगितले.

इस्टेट एजंट असलेल्या जनार्दन मराडे यांनी सापेले येथील 61 गुंठे जमिनीचा व्यवहार ठरवला. त्यात दीड लाख रुपये गुंठा याप्रमाणे 91 लाख 95 हजार एवढी रक्कम रतन कोकणे यांना त्या जागेच्या बदल्यात देण्याचे ठरले. मात्र खरेदीखत तयार करताना मराडे याने त्यावर 34 लाख 54 हजार रुपये कोकणे कुटुंबाला देणे असल्याचे नमूद केले. त्यातदेखील 19लाख रुपये रतन कोकणे यांचा मुलाकडून जुने येणे आहे, असे दाखवून ती वेगवेगळ्या लोकांच्या नावे बेअरर चेकद्वारे मराडे यांच्या खात्यातून काढली आणि परत घेतली.

 त्यानंतर आमचे उर्वरित पैसे द्या, असे अनेकवेळा सांगूनदेखील मराडे याने रतन कोकणे किंवा त्यांच्या मुलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले नाहीत. त्यामुळे रतन कोकणे यांनी जानेवारी 2021मध्ये कर्जत पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याबाबत तक्रार दिली. मात्र तेथे चुकीचा सल्ला मिळाल्याने रतन कोकणे यांनी मार्च 2021मध्ये कर्जत दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यावर न्या.

तोकले यांनी दिलेल्या आदेशानुसार कर्जत पोलिसांनी 15 मार्च 2021 रोजी जनार्दन दामू मराडे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply