Breaking News

कळंबोलीतील पावसाळी गटारांत मलमिश्रित पाणी

समस्येसंदर्भात दखल घेण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर

कळंबोली सेक्टर 14 येथील पावसाळी बंदिस्त गटारे साफ केली असली तरी त्याच्यामध्ये मल मिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये राहणार्‍या सदनिकाधारकांचे आरोग्य धोक्यात आहे. ही समस्या त्वरित निकाली काढण्याची मागणी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी केली आहे. यासंदर्भात सिडकोच्या कार्यकारी अभियंता यांना पत्र दिले आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये कळंबोली वसाहतीतील सेक्टर 14 आहे. याठिकाणी पावसाळी बंदिस्त गटारे आहेत. दरवर्षी त्यामधील माती पूर्णपणे न काढल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून या परिसरातील जनजीवन विस्कळीत होते. याबाबत नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी सिडको कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत आपण येथील बंदिस्त गटारांमधील माती काढली आहे. दोन चेंबरचे अंतर कमी करून आतमधील संपूर्ण माती डेब्रिज आणि कचरा सिडकोने बाहेर काढला, परंतु काही दिवसांपासून या पावसाळी गटारांमध्ये मलमिश्रीत सांडपाणी साचत आहे. नेमके हे पाणी कुठून येत आहे याविषयी माहिती मिळाली नाही. बाजूची मलनिस्सारण वाहिनी फुटुन  सांडपाणी पावसाळी गटारांमध्ये जात असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, हे पाणी साचत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या सोसायटीमधील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांची उत्पत्ती होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. या संदर्भात राजेंद्र शर्मा यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. त्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

‘उघड्या गटांरांना झाकणे बसवा’

सिडकोने पावसाळी गटारांची साफसफाई केलेली आहे. बंदिस्त असलेल्या गटांरांना झाकणे न लावल्याने आतमध्ये पुन्हा माती कचरा जात असल्याचे दिसून येत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून सिडकोने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक म्हणून शर्मा यांनी केले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply