दिवसाला देणार 10 हजार जणांना डोस
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पालिका प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. रुग्णवाढीमुळे आरोग्यव्यवस्थेवर भर दिला जात असताना जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लस देण्याचे नियोजन आहे. या लसीकरणामध्ये आता वाढ करण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे. दिवसाला पाच हजार जणांना होणारे लसीकरण आता दिवसाला 10 हजारांपर्यंत नेणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
लसीकरणाचा तिसरा टप्पाही सुरू झाला असून सध्या शहरात पालिका व खासगी रुग्णालयात मिळून 42 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.
पालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली या तीन रुग्णालयांत दिवसरात्र लसीकरण सेवा दिली जात आहे. तर तुर्भे माताबाल रुग्णालय व 19 नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण केले जात आहे. याशिवाय सेक्टर 5 वाशी येथील ईएसआयएस रुग्णालयामध्ये जम्बो लसीकरण केंद्र सुरू केले असून ते सकाळी 8 ते रात्री 8 अशा दोन पाळ्यांमध्ये 4 बूथवर लस दिली जात आहे. पालिकेच्या 26 केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे. याशिवाय 16 खासगी रुग्णालयांमध्येही शासनमान्य 250 रुपये प्रतिमात्रा दराने लसीकरण केले जात आहे. 31 मार्चपर्यंत पहिल्या व दुसर्या टप्प्यातील 93 हजार 369 जणांना लशीची मात्रा देण्यात आली होती. तर 1 एप्रिलपासून तिसरा टप्पा सुरू झाला असून पहिल्या दिवशी 3,326 जणांना लस देण्यात आली होती. शुक्रवारपर्यंत शहरातील 1 लाख 5 हजार 897 जणांना लशींची महिली मात्रा तर 19 हजार 912 जणांना लशीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे. मोठ्या सोसायट्या किंवा गृहसंकुलांतील नागरिकांना आता एकाच वेळी लसीकरण करण्यात येणार आहे.
साडे चार लाख जणांच्या लशींचे नियोजन
दोन दिवसांपासून तिसर्या टप्प्यातील लसीकरण सुरू असून आता जास्तीत जास्त नवी मुंबईकरांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत पालिका आयुक्तांनी शहरातील चार लाख 50 हजार जणांना लस देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सध्या दिवसाला पाच हजार जणांना लस देण्यात येत आहे. मात्र यापुढे आता ही संख्या दहा हजारांपर्यंत वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.