पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पालिका क्षेत्रातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांवर कोरोना प्रतिबंधक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. गृहनिर्माण सोसायट्यांनी कोरोना नियंत्रण करणार्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्या पदाधिकारी-सदस्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अनेक वेळेला सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमधील कोरोना रुग्ण बाहेर सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळत आहेत. या रुग्णांमुळे साथरोग वेगाने पसरण्याची शक्यता असल्याने अशा रुग्णांनी घरीच विलगीकरणात राहणे गरजेचे आहे. त्याबाबत गृहनिर्माण सोसायट्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा सोसायट्यांसाठी पालिकेने वेळोवेळी लागू केलेले नियम पाळणे बंधनकारक आहे. पाचहून अधिक कोरोना रुग्ण असणार्या सहकारी गृहनिर्माण संस्था मायक्रो कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित केली जाईल, तसेच सोसायटीच्या प्रवेशद्वारावर माहिती देणारे फलक लावून अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही. कोविड-19 मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो. नंतर स्थानिक अधिकार्यांनी ठरविल्यानुसार अधिकचा दंड आकारला जाऊ शकतो. सर्व गृहनिर्माण सोसायट्यांनी आपल्या इमारतीत नियमितपणे येणार्या सर्व व्यक्तींनी शासकीय नियमांनुसार लसीकरण होईपर्यंत त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी. कंटेन्मेंट झोन केलेल्या सोसायटीच्या आत-बाहेर जाणार्या व्यक्तींची नोंद ठेवली पाहिजे. त्यासोबतच सोसायटीच्या प्रांगणात सदस्यांनी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. सोसायटीतील उदवाहनचा (लिफ्ट) वापर करताना आतील किंवा बाहेरील बटनांचा स्पर्श टाळण्यासाठी टुथपिक अथवा कागदाचा कपटा आदींचा वापर करावा. शक्य असल्यास उदवाहन वापर करणे टाळावे. सोसायटीचे जिने, कठडे व आवाराची वेळोवेळी साफसफाई करून निर्जंतुकीकरण करावे. सोसायटीमध्ये बाहेर गावाहून व्यक्ती आल्यास त्याबाबतची माहिती प्रशासनास तातडीने कळविण्यात यावी.
पदाधिकारी, सदस्य असतील जबाबदार
महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन करणार्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार नियमांचे उल्लंघन करणार्या सोसायटीचे पदाधिकारी किंवा सदस्यांवरही आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि साथरोग अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.