उरण : वार्ताहर
देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियमांचे पालन आणि कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर उरणमध्ये लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. उरणमध्ये आतापर्यंत 3930 जणांचे लसीकरण झालेले असून दररोज 100 जणांना डोस दिले जातात. भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्यासह अनेकांनी गुरुवारी (दि. 8) कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली. उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उरण शहरातील नागरिक कोविड लस नाव नोंदणी करण्यासाठी ठिक-ठिकणी रांगा लावून असतात. आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने उरण तालुका भाजपच्या वतीने गणपती चौक भाजप कार्यालय येथे मोफत कोविड लसीकरण नोंद 21 मार्चपासून सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत केली जाते. या वेळी भाजप कार्यकर्ते नागरिकांना मदत करीत आहेत. नागरिकांचे कोविडपासून संरक्षण व्हावे ह्या उदेशाने उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात कोविडच्या लसीकरणास 28 जानेवारी 2021 पासून सुरुवात झाली आहे. त्यात कोविशील्ड, कोवॅक्सिन अशा दोन प्रकारच्या लसी आहेत. कोविशील्डचा डोस घेतल्यानंतर 45 दिवसांनंतर दुसरा डोस दिला जातो. त्याचप्रमाणे कोवॅक्सिन लस घेल्यानंतर दुसरा डोस 28 दिवसांनंतर दिला जातो. आतापर्यंत कोविशील्डचे 3070 व कोवॅक्सिनचे 860 डोस देण्यात आले आहे. एकूण 3930 डोस देण्यात आले आहेत. दररोज 100 नागरिकांना डोस देण्यात येतात, अशी माहिती इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांनी दिली. इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात नागरिकांना कोविड लस घेण्यास त्रास होऊ नये त्यांना सहज लस मिळावी यासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे, पत्रकार, आरोग्य सेवक मोहन जगताप, परिचारिका सारीका शेनेकर, परिचारिका निवेदिता कोटकर, आरोग्यसेविका विलासिनी बोर्वेकर, नितेह झेंडेकर, दीपिका मळगावकर व कर्मचारी सहकार्य करीत आहेत. सर्व मंडळी नागरिकांना चांगले मार्गदर्शन करून सहकार्य करीत आहेत. मदत करीत आहेत. लस घेतल्यानंतर नागरिक आभार मानत आहेत.