Breaking News

सिंधूचा सहज, सायनाचा संघर्षमय विजय

सिंगापूर : वृत्तसंस्था

पी. व्ही. सिंधूने शानदार विजयासह सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, परंतु सायना नेहवालला दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पोर्नपावी चोचूवाँगविरुद्ध विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागला. पुरुषांमध्ये समीर वर्मा आणि किदम्बी श्रीकांतने आगेकूच केली, तर पारुपल्ली कश्यपचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.

रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या चौथ्या मानांकित सिंधूने 39 मिनिटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावरील मिआ ब्लिशफेल्डचा 21-13, 21-19 असा पाडाव केला. डेन्मार्कच्या मिआविरुद्ध सिंधूने हा सलग दुसरा विजय संपादन केला. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूची आता चीनच्या काय यानयानशी गाठ पडणार आहे.

सायना नेहवालने थायलंडच्या चोचूवाँगला 21-16, 18-21, 21-19 असे हरविले. लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सायनाची पुढील फेरीत जपानच्या द्वितीय मानांकित नोझोमी ओकुहाराशी गाठ पडणार आहे.

पुरुष एकेरीत कश्यपला तीन गेममध्ये रंगलेल्या लढतीत हार पत्करावी लागली. चीनच्या चौथ्या मानांकित चेन लाँगने कश्यपला 21-9, 15-21, 21-16 असे नामोहरम केले. समीरने आपली विजयी घोडदौड कायम राखताना चीनच्या लू गुआंगझूला 21-15, 21-18 असे पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत त्याची तैपेईच्या द्वितीय मानांकित चोऊ टीन चेन किंवा डेन्मार्कच्या यान ओ जॉर्गेनसेनशी गाठ पडणार आहे. सहाव्या मानांकित श्रीकांतने डेन्मार्कच्या हॅन्स-क्रिस्तियन सॉलबर्ग व्हिटिंगहसचा 21-12, 23-21 असा पराभव केला.

प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठताना जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावरील हाँगकाँगच्या टँग चून मॅन आणि से यिंग सूएटचा 21-17, 6-21-21-19 असा पराभव केला.

Check Also

पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय …

Leave a Reply