Breaking News

राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी?

मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

मुंबई ः प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 10) दुपारी सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात पुढील आठवड्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री चाचपणी करण्याची शक्यता आहे.
राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मागील वर्षी जसा कडक लॉकडाऊन होता तसा लावण्याबाबत शनिवारच्या बैठकीत मुख्यमंत्री सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला महाविकास आघाडीतील तिनही पक्षांचे प्रमुख नेते, तसेच भाजप, मनसे, रिपाइं, समाजवादी पक्ष यासह सर्व पक्षांच्या नेत्यांना बोलवण्यात आले आहे.
राज्यात सध्या कडक निर्बंध लावण्यात आले आहेत, मात्र तरीही रुग्ण संख्या आटोक्यात येत नाही. दुसरीकडे आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे, बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सरकार आता संपूर्ण लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहे. सध्या राज्यातील कोरोनासंदर्भातील नियम अधित कठोर करण्यात आले आहेत. शुक्रवार रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कठोर लॉकडाऊन असणार आहे. रात्री 8 नंतर संचारबंदीचा नियम पाळला जातोय. त्याआधीच दुकाने, कार्यालये बंद करण्यास सांगितले गेले आहे. त्यामुळे कडक नियमांच्या आड लॉकडाऊनची तयारी सुरू आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
पुढील आठवड्यात 13 एप्रिलला गुढीपाडव्याची, तर 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुटी आहे. त्यामुळे या दोन शासकीय सुट्या लक्षात घेता पूर्ण आठवडाभर कडक लॉकडाऊन लावता येईल का याची चाचपणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत करणार आहेत. शनिवारची ही बैठक व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेण्यात येणार आहे. आता या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply