नागोठणे ः प्रतिनिधी
येथील ग्रामपंचायत हद्दीत मुंबई-गोवा महामार्गालगत असणार्या एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करणार्या 15 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेनंतर नागोठण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागोठणे येथील या हॉटेलमध्ये साधारणतः 25 ते 30 कर्मचारी आणि कामगार आहेत. त्यांची शुक्रवारी (दि. 9) सकाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी केली असता, त्यापैकी 15 जण पॉझिटिव्ह आढळले. हे नावाजलेले हॉटेल महामार्गावर असल्याने मुंबई तसेच महाड, महाबळेश्वर, रत्नागिरी, गोव्याकडे जाणारी बहुतांशी खासगी वाहने आणि बसेस अल्पपोहार, भोजन करण्यासाठी येथे थांबून पुढे मार्गस्थ होत असतात. रुग्णांची संख्या वाढण्याची भीती असल्याने संबंधित हॉटेल तातडीने बंद करण्यात आले असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी सांगितले.
येथील केंद्रात शुक्रवारी 120 नागरिकांना कोविडची लस देण्यात आली आहे. यापूर्वी आठवड्यात फक्त तीन दिवसच लसीकरण केले जायचे, मात्र रविवार वगळता इतर सहाही दिवस लसीकरण उपलब्ध राहणार आहे. लसीचा साठा मुबलक प्रमाणात असून कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याचेही डॉ. म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …