Breaking News

नेरळचे भाजी मार्केट आता मैदानात; कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस आणि ग्रामपंचायतीकडून नियोजन

कर्जत : बातमीदार

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने कडक निर्बंध आणले आहेत. त्यात दिवसा जमावबंदी आदेश लागू असल्याने सार्वजनिक अंतर राखले जावे यासाठी नेरळमध्ये सर्व भाजीपाला व फळे विक्रेते यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात मार्केट सुरू करण्यात आले आहे. नेरळ ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून मागील वर्षाप्रमाणे हे मार्केट सुरू केले आहे. कोरोनामुळे घालण्यात आलेले निर्बंध आणि जमावबंदीचे आदेश लक्षात घेवून, बाजारात गर्दी करू नका, असे आवाहन पोलीस प्रशासन नेरळमधील नागरिकांना करीत आहे. तरीदेखील नागरिक सूचनांचे पालन करीत नसल्याने नेरळ पोलीस ठाण्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या मध्यभागी असलेल्या शिवाजी महाराज मैदानात सार्वजनिक अंतर ठेवत भाजीपाला आणि फळे विक्रीचा बाजार भरविण्याचा निर्णय घेतला. त्याला सर्व भाजीपाला व्यापार्‍यांनी प्रतिसाद दिला असून नेरळ ग्रामपंचायतीने तेथे प्रत्येक भाजीपाला विक्रेत्याला जागा निश्चित करून दिली आहे.त्याचवेळी खरेदीसाठी आलेल्या लोकांसाठी रेषा आखून देण्यात आल्या आहेत. तेथे खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय नेरळ ग्रामपंचायतीने केली आहे. सकाळी आठ ते सायंकाळी सात या वेळात शिवाजी महाराज मैदानात हा बाजार भरत आहे. अन्य ठिकाणी आणि बाजारपेठ भागात बसून कोणीही भाजीपाला आणि फळे विक्री करू नये, असे आवाहन नेरळ ग्रामपंचायत आणि पोलीस करीत आहेत. गतवर्षी एप्रिल महिन्यात राज्यात पहिल्यांदा नेरळमध्ये पोलीस आणि ग्रामपंचायतीने असा प्रयोग राबविला होता. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर शिवाजी महाराज मैदानात चिखल झाल्याने हा बाजार बंद करण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा खुल्या मैदानातील बाजाराला नेरळकरांनी प्रतिसाद दिला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply