पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल परिसरात गोरगरीब रुग्णांसाठी कमीत कमी पैशात रास्त उपचार व्हावेत या सामाजिक जाणिवेतून पतीच्या पश्चात पटवर्धन हॉस्पिटल हे राष्ट्रीय जनकल्याण समितीकडे सुपूर्द करणार्या सामाजिक कार्यकर्त्या नीलाताई पटवर्धन यांचे रविवारी (दि. 11) पहाटे वार्धक्याने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. नीलाताईंचा जन्म खालापूर तालुक्यातील वावोशी येथे 6 जून 1939 रोजी झाला. वावोशी येथे प्राथमिक, तर पेण येथे माध्यमिक शिक्षण झाल्यावर पुण्याच्या एसपी महाविद्यालयातून पदवी मिळविणार्या वावोशी गावातील त्या पहिल्या महिला होत्या. वडील दत्तात्रय पांडुरंग (नाना) टिळक यांच्यापासून त्यांना सामजिक सेवेचा वारसा लाभला होता. 20 जानेवारी 1962 रोजी डॉ. प्रभाकर कृष्णाजी पटवर्धन यांच्याबरोबर विवाह झाल्यावर त्यांनी पनवेलमध्ये पतीच्या बरोबरीने सामाजिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. नीलाताईंनी पनवेलमध्ये स्त्री सखी महिला औद्योगिक संस्था, स्वयंसिद्धा महिला पतपेढी व सर्व महिला मंडळांना एकत्र करून एकता महिला मंडळाची स्थापना केली. गरीब व गरजूंना आर्थिक आणि वैद्यकीय सहाय्य करण्यासाठी कृष्ण भारती ट्रस्टची स्थापना त्यांनी केली. ज्येष्ठ नागरिक संघ, वासुदेव बळवंत फडके विद्यालय सभागृह उभारणीस मदत केली. पतीच्या निधनानंतर जागेसह सर्व हॉस्पिटल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला दान दिले. त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राज्य स्त्रीशक्ती पुरस्कार, पनवेल भूषण व इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.