स्वतंत्र कोविड हॉस्पिटलसंदर्भात सर्वपक्षीय बैठक
खोपोली : प्रतिनिधी – खोपोली नगर परिषद क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. येणार्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर संक्रमण होण्याचा धोका आहे. अशा स्थितीत शहरातील नागरिकांवर शहरातच उपचार होण्यासाठी स्वतंत्र कोविड-19 उपचार रुग्णालय निर्माण होण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात शहरातील डॉक्टर व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असून, यासाठी पहाणी व आढावा बैठक सोमवारी (दि. 29) तहसीलदार कार्यालयात झाली.
या बैठकीला प्रांत अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार इरेश चप्पलवार, नगराध्यक्ष सुमन औसरमल, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर, गटनेते सुनील पाटील, ज्येष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, मुख्याधिकारी गणेश शेटे, आरोग्य सभापती वैशाली जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक ग्रुपचे सदस्य, डॉ. मोहिते, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.
नगर परिषद क्षेत्रातील शीळफाटा येथील नव्याने निर्माण झालेले प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व त्याला लागून असलेली पालिका शाळा तसेच लायन्स क्लब सभागृह, शीळफाटा येथील मदरसा इमारत किंवा येथील साई रिव्हर रिसॉर्ट असे पर्याय यासाठी आहेत. या ठिकाणी स्थानिक पातळीवर कोविड तपासणी व उपचार होण्यासाठी रुग्णालय निर्मिती होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या सर्व ठिकाणची पहाणी प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांनी केली. याबाबत लागणार्या आवश्यक सुविधा, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवा देणारे कर्मचारी, दैनंदिन साफसफाईबाबतची व्यवस्थेसह गरज पडल्यास ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची व्यवस्था होण्याची गरज गृहीत धरून या सर्व बाबतीत चर्चा करण्यात आली. प्रांत अधिकारी परदेशी यांनी शासन नियम, कोविड उपचारासाठीचा प्रोटोकॉल, संभाव्य तांत्रिक अडचणी व भविष्याची तयारी या सर्व विषयांवर मार्गदर्शन केले.
महत्त्वाची बाब म्हणजे कोविड उपचार केंद्र सुरू झाल्यास खोपोलीतील खासगी डॉक्टर व येथील सामाजिक कार्यकर्ते स्वतःहुन पुढाकार घेऊन सेवा देण्यास तयार आहेत तसेच तांत्रिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी शहरातील दानशूर व्यक्ती व काही उद्योजकांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. पार्वती हॉस्पिटलचे डॉ. मोहिते यांनी त्यांच्या डॉक्टर पत्नी व स्टाफसहित कोविड सेंटरसाठी 24 तास सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे खोपोली शहर व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, स्थानिक स्तरावर येथील नागरिकांना कोरोनावर उपचार उपलब्ध होणार आहेत.