पनवेल : वार्ताहर
तळोजा एमआयडीसीमधील मेडलाईफ इंटरनॅशनल प्रा. लि.तर्फे स्नोमॅन लॉजिस्टिक लिमिटेड, सीआर 606, प्लॉट नंबर के 12, बी.ई.एल. नाक्याजवळील या कंपनीत अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकली. या वेळी संरक्षण विभाग, शासकीय वैद्यकीय विमा, शासकीय रुग्णालये, गरीब व गरजू लोकांसाठी असणारी औषधे खुल्या बाजारात बेकायदेशीर उपलब्ध करण्यासाठी औषधांवरील लेबलवर खाडाखोड करून त्याच्यावर पुन्हा प्रिंटिंग करून ती बेकायदेशीर विक्रीसाठी उपलब्ध केल्याच्या आरोपाखाली कंपनीच्या संचालकांसह व्यवस्थापकावर तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बी.ई.एल. नाका येथील देवाचापाडा गावाशेजारी असलेल्या स्नोमॅन कंपनीत शासनाने संरक्षण विभाग, ईएसआयसी, शासकीय रुग्णालये, गरीब व गरजू अशा लोकांसाठी म्हणून तयार करण्यात आलेली औषधांच्या लेबलवर खाडाखोड करून ती अवैधरीत्या खुल्या बाजारात उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. यानुसार संबंधित विभागाने काही दिवसांपूर्वी या कंपनीवर धाड टाकली होती. यामध्ये जवळपास 17 लाख 79 हजार रुपये किमतीची औषधे ताब्यात घेऊन यानंतर नमुने तपासणीसाठी घेण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाने एस. के. लॉजिस्टिक प्रा. लि. वडपे, भिवंडी या ठिकाणी औषधे ओव्हर प्रिंटिंगसाठी जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणीदेखील धाड टाकली व चौकशी केल्यानंतर यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार होत असून, शासनाची व गरीब जनतेची मोठी फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे.