मोहोपाडा : प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळीत केले आहे. कोरोना संसर्ग कधी, कुठे, कसे, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगू न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रसायनी परीसरातील वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद हद्दीत कोरोनाने पहिल्या लाटेपासूनच आपली दहशत निर्माण केली. यातच तालुक्यात खोपोली नगरपालिका हद्दीत दुसर्या कोरोना लाटेत कोरोनाची रुग्णसंख्या मोठी असून वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्द दुसर्या स्थानावर आहे.
वासांबे (मोहोपाडा) कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीचा आलेख गेल्या 15 दिवसांपासून परिसरात वाढतच आहे. सध्या वासांबे (मोहोपाडा) जिल्हा परिषद विभागात 13 एप्रिलपर्यंत एकूण 148 रुग्ण अॅक्टीव्ह असून परिसरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 702 झाली आहे. यात कोरोनावर 554 जणांनी मात केली आहे. परिसरात मृत्यूदर जरी कमी असला तरी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन होत आहे.
दरम्यान, 13 एप्रिलपर्यंत चौक मंडलात एकूण 1231 रुग्ण संख्या असून एकूण 44 जण मयत झाले आहेत. खालापूर तालुक्यात वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीत कोरोनारुग्णांची संख्या लक्षणीय असून कोरोनासंसर्गाचा आलेख मे मध्यंतरी दिलासादायक राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन कोरोनाला परिसरातून हद्दपार करावा, तसेच 45 वर्षांवरील सर्वांना कोविशिल्ड लसीकरण सुरू केले असून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी विनाकारण बाहेर न फिरता वेळोवेळी हातपाय स्वच्छ धुवावेत, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा, असे आवाहन होत आहे.
जिल्ह्यात 12 एप्रिलपर्यंत एकूण 157928 लसीकरण झाले आहे. यात पहिली लस 142174 जणांनी घेतली, तर दुसरी लस 15754 जणांनी घेतली आहे. कोरोना संसर्गाने मृत्यूदर कमी असून यातील 85 टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आढळतात. यात कॅन्सर, टिव्ही, मधुमेह, हायपर टेन्शन व अन्य आजारांमुळे मृत्यू रुग्णांमध्ये जास्त असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
गावनिहाय आकडेवारी
ठिकाण अॅक्टीव्ह रुग्णसंख्या
मोहोपाडा 27
रिस परिसर 68
नविन पोसरी 7
चांभार्ली 12
शिवनगर 3
आली आंबिवली 3
लोधिवली परिसर 19
पानशिल 3
तळेगाव 3
रिसवाडी 01
तळेगाव वाडी 01
पराडे 01