Breaking News

आंबेवाडी ते निवीपर्यंतच्या कालव्याच्या कामाबाबत ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; तहसीलदारांशी केली चर्चा

धाटाव : प्रतिनिधी
आंबेवाडी ते निवीपर्यंतच्या कालव्याला अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. मूळात कालव्याची कामेच पूर्ण नाहीत. याबाबतच ग्रामस्थांत संताप असतानाच तिसे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मोठ्या सायपनची काम स्थानिकाच्या गोंडस नावाखाली एका ठेकेदाराने थांबविल्याने कालव्याच्या कामाला भलतीच खीळ बसली. मला भेटायला सांगा, तुमचा शेठ मला भेटल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही अशी अरेरावी माणसे पाठवून संबंधीत ठेकेदाराने कामगारांना केली आणि कालव्याचे काम थांबवले. त्यामुळे आधीच उशीर झालेल्या कालव्याचे पाणी तहानलेल्या गावांना मिळणार कधी, कालव्याची कामे पूर्ण होणार कधी ? असा सवाल उठवत शनिवारी समन्वय समितीच्या ग्रामस्थांनी काम थांबवणार्‍याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. तहसीलदार किशोर देशमुख यांच्याशी चर्चा केली तर कालव्याचे काम करणार्‍या अधिकृत ठेकेदाराला धमकावल्याप्रकरणी दखल घ्या, असे आशयाचे निवेदन शनिवारी दि. (8) संबंधीत ग्रामस्थांनी कोलाड पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक अजित साबळे यांना दिले. दरम्यान, कालव्याची कामे तातडीने न केल्यास, कालव्याला पंधरा दिवसात पाणी न सोडल्यास आम्ही पुन्हा आंदोलन करण्यावर ठाम आहोत असा ईशारा ग्रामस्थांनी दिला तर कालव्याची कामे व कालव्याला पाणी सोडण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू अशी प्रतिक्रिया तहसीलदार किशोर देशमुख यांनी दिली. त्यामुळे आता कालव्याची कामे नक्की कधी पूर्ण होऊन कालव्याला पाणी सोडले जाते? याकडे सबंध ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
आंबेवाडी ते निवीपर्यंतच्या कालव्याला पाणी नसल्याने विभागात कायम भयान स्थिती उद्भवते हे प्रशासन व सृजान समाजासमोर आले आहे. तत्कालीन तहसीलदार कविता जाधव यांनी अत्यंत गांभीर्याने कालव्याच्या पाण्याकडे लक्ष घातले. रायगड पाटबंधारेच्या कार्य अभियंता दीपेश्री राजभोज यांनी कालव्याच्या कामे निधीसाठी शर्तीचे प्रयत्न करून कामाला गती दिली. 50 वर्षानंतर सायपनची कामे अद्दयावत होत आहेत. कालव्याची साफसफाई झाली. विभागीय अभियंता महामुनी, अभियंता गोरेगावकर यांनी ग्रामस्थांच्या भावना जपत जाणीवेतून सतत पाठपुरावा केला आहे. आजगायत अंदाजे 70 टक्के कामे पूर्ण झाली. दुसरीकडे सर्वात मोठा सायपन असलेल्या तिसे ग्रामपंचायत हद्दीतील कामाला प्रारंभ करणार तोच राजकीय धोंडे आडवे यायला सुरुवात झाली. मला भेटायला सांगा, तोपर्यंत काम करायचे नाही, अशी धमकी संबंधीताच्या लोकांनी दिल्याने कामगार बिथरले. त्यांनी काम करण्यास नकार दिला. कालव्याचे कामच ठप्प झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. अधिकृत ठेकेदाराच्या माणसांना, यंत्रणांना संरक्षण द्या, असे निवेदन कोलाड पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक अजित साबळे यांना ग्रामस्थांनी देऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी कालवा समन्वय समितीचे विठ्ठल मोरे, तुकाराम भगत, चंद्रकांत बामुगडे, प्रशांत राऊत, राजेंद्र जाधव, अंतोष शिर्के व ग्रामस्थ उपस्थित होते. कालवा कामाची पाहणी पाटबंधारेचे अधिकारी, ग्रामस्थ यांच्या समवेत तातडीने केली जाणार असल्याचेही सुतोवाच देशमुख यांनी दिले. अशात कालव्याचे काम थांबविले जाणार नाही, याकडे प्रशासनाने पाहावे, अन्यथा आम्ही ग्रामस्थ पाण्यासाठी पुन्हा आंदोलन सुरू करू असा इशारा ग्रामस्थ प्रशांत राऊत यांनी दिला. कालव्याच्या कामाला, पाण्याला कोणीच अडथळा आणू नयेत, पाण्याचे पुण्य घ्या, विरोध करू नका असे आवाहन विठ्ठल मोरे यांनी केले. दरम्यान, संबधीत अधिकृत ठेकेदाराने कालव्याचे काम सुरू करावे, काही अडचण आल्या तर आम्हाला कळवा, असे स्पष्ट आश्वासन सहा. पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी दिले, तर तहसील, पोलीस प्रशासनाने पाण्याबाबतच्या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे.

पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावा
तहसीलदार किशोर देशमुख यांनीही कालव्याचा पाणी विषय गांभीर्याने घेतला आहे. कालव्याची कामे व पाणी प्रश्न तातडीने मार्गी लावा, अशा सूचना पाटबंधारे प्रशासनाला दिल्याची प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली.

प्रशासनाला निवेदन
कालव्याचे काम थांबवले हे समजतात विभागीय ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. संबंधीत ठेकेदाराविरोधात कोलाड पोलीस प्रशासनाला दखल घेण्याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply