Breaking News

पनवेलमध्ये ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण

116 बेडला पाइपलाइनद्वारे होणार पुरवठा

पनवेल : वार्ताहर

पनवेल उपजिल्हा रुग्णालय हे कोविड हॉस्पिटल आहे. याठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. येथे ऑक्सिजन बेड आणि अतिदक्षता विभाग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासते. या सर्व दृष्टिकोनातून या रुग्णालयात सहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सीजन प्लांट उभारण्यात आलेला आहे. त्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.

दुसर्‍या लाटेत कोरोनाविषाणूचे  संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढू लागलेली  आहे. यावेळी या आजारात संपूर्ण कुटुंबाची कुटुंब बाधित होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातली त्यात वृद्ध आणि इतर आधार असणार्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येते. या आजारांमध्ये ऑक्सिजन पातळी खालावल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागतो. त्यामुळे अशा रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागतो. पनवेल परिसरात सुद्धा रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. एक वर्षापूर्वी पनवेल उपजिल्हा रुग्णालय जिल्हा कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून येथे कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तरी मध्यंतरी काही प्रमाणात रुग्ण संख्या घटली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोना च्या दुसर्या लाटेने मोठ्या प्रमाणात संक्रमण केले आहे. त्यामुळे दररोज 500 पेक्षा जास्त रुग्ण पनवेल परिसरात आढळून येत आहेत. त्यापैकी अनेकांना ऑक्सिजनची गरज भासते. त्यामधील काही ना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले जाते.

ऑक्सिजनची गरज पाहता या रुग्णालयात ऑक्सीजन बेड तयार करण्यात आले आहेत. पाइपद्वारे ऑक्सिजनचे वितरण करण्यात आले आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात 116 बेडला ऑक्सिजन लावण्यात आला आहे. याठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवावा लागतो. याची वाढती मागणी पाहता पनवेल उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन  प्लांट तयार करण्यात आला आहे. त्याची क्षमता 6000 लिटर इतकी आहे. या प्लांटचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या वेळी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, तहसीलदार विजय तळेकर, वैद्यकीय अधीक्षक बसवराज लोहारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

कमतरता भासणार नाही

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या प्लांटमध्ये ऑक्सिजन साठवणूक क्षमता आहे. सध्याची स्थिती पाहता 116 बेडला कमीत कमी दोन दिवस पुरेल इतका ऑक्सिजन साठा करता येऊ शकतो. पूर्वीप्रमाणे पनवेल उपजिल्हा रुग्णालय ऑक्सिजनची कमतरता यामुळे भासणार नाही. त्यामुळे रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन त्वरित उपलब्ध करून देता येईल. यामुळे रुग्णांचे प्राण नक्कीच वाचतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply