Breaking News

राज्यात आणखी दोन-तीन दिवस  ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा

मुंबई ः प्रतिनिधी
राज्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे, तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणाला कोलमडत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी कोरोनाबाधितांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 16) एक बैठक झाली. या बैठकीनंतर अन्न व प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना रेमडेसिवीरचा आणखी दोन-तीन दिवस तुटवडा जाणवणार असल्याचे म्हटले आहे.
डॉ. शिंगणे म्हणाले, आपल्याला लागणारे रेमडेसिवीरचे इंजेक्शन हे कंपन्यांकडून जवळपास आज 12 हजार ते 15 हजार इतके कमी मिळालेले आहे. त्यामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा अजूनही दोन ते तीन दिवस सहन करावा लागणार आहे. नुकतीच माझी काही कंपन्यांच्या एमडी व सीईओंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. भविष्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कशा प्रकारे त्या कंपन्यांच्या माध्यमातून ते वाढवून देतील? किती वाढवला जाणार आहे? याचा आढावा घेतला. दररोज रुग्णांची संख्या वाढत असताना रेमडेसिवीरचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.
याचबरोबर केंद्र शासनाने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय तीन-चार दिवसांअगोदर घेतला. रेमडेसिवीरची निर्यात बंदी त्यांनी केली हे खूप चांगले काम झाले आहे. यामुळे निर्यातीसाठी तयार असलेला रेमडेसिवीरचा मोठा साठा देशभरातील व काही महाराष्ट्रातील कंपन्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात या कंपन्यांना त्यांचा माल इथे विकण्यासाठी परवानगी देण्याबाबत आम्ही कालच बैठक घेतली आहे. शिवाय विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याशीदेखील बोलणे झाले आहे. आता त्या कंपन्यांशी संपर्क साधण्याचे काम आमच्या विभागाकडून सुरू आहे, अशी माहिती या वेळी शिंगणे यांनी दिली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply