मुंबई, नवी दिल्ली ः प्रतिनिधी, वृत्तसंस्था
महाराष्ट्र सरकारने औषध कंपन्यांशी संपर्क साधून मागणी केल्यानंतर, केंद्र सरकारने त्यांना तुम्ही महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन द्यायचे नाही. दिल्यास तुमच्यावर कारवाई करू, अशी धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते तथा राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला, तसेच या संदर्भात ट्विटही केले. त्याला भाजपने जोरदार प्रत्युत्तर देत मलिक आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरेंनी निर्लज्ज राजकारण थांबवावे
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर भेदभाव करीत असल्याचा आरोप केल्यानंतर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी परखड शब्दांमध्ये महाराष्ट्र सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी, असे ट्विट गोयल यांनी केले आहे.
नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर पुरवठ्यावरून आरोप केल्यानंतर पीयुष गोयल यांनी चार ट्विट करीत राज्य सरकारला लक्ष्य केले. ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरेंनी चालवलेल्या क्लुप्त्या पाहून दु:ख झाले. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचे उत्पादन व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. आपण सध्या आपल्या क्षमतेच्या 110 टक्के ऑक्सिजनची निर्मिती करीत असून, उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजनदेखील वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असून, त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करीत आहे, असे गोयल म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकार आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या लोकांसाठी योग्य ते काम करीत आहे. महाराष्ट्रातील नागरिक माझे कुटुंब माझी जबाबदारीचे योग्य पद्धतीने पालन करीत आहेत, पण आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची कर्तव्ये पाळून माझे राज्य, माझी जबाबदारी हे तत्त्व पाळण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत गोयल यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
पुरावे द्या; अन्यथा राजीनामा द्या
नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे बेशरमपणा, खोटारडेपणचा कळस आहे. मलिक यांनी आपल्या आरोपाचे पुरावे द्यावे; अन्यथा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, असे आव्हान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिले आहे.
‘ऑक्सिजनचा तुटवडा, बेडचा तुटवडा, रेमडेसिव्हीरचा तुटवडा आणि यांचे मंत्री कुठल्या बिळात लपून बसले आहेत. ट्विटरवरून खोटे आणि बेशरमपणाचे आरोप करतायत. नवाब मलिक यांनी पुरावे द्यावे; अन्यथा राजीनामा देऊन महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी’, असे आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.
मलिकांचे आरोप धादांत खोटे
नवाब मलिक यांच्या आरोपाचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी खंडण केले आहे. मांडवीय यांनी ट्विट करून या संदर्भात मलिक यांचे कान उपटले आहेत.
मांडवीय म्हणाले की, नवाब मलिक यांनी केलेले आरोप धक्कादायक आणि खोटे आहेत. त्यांनी दिलेली माहिती ही अर्धसत्य आणि खोटी आहे. त्यांना वास्तविक माहिती नाही. केंद्र सरकार रेमडेसिवीरच्या पुरवठ्याबाबत सातत्याने राज्य सरकारशी संपर्कात आहे, तसेच कोणत्याही प्रकारे रेमडेसिवीर महाराष्ट्राला पुरविण्यास मदत करीत आहे. आम्ही देशातील रेमडेसिवीरचे उत्पादन दुपटीने वाढवत आहोत आणि उत्पादकांना 12 एप्रिलपासून 20हून अधिक प्लांटला तत्काळ परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील जनतेला पुरेसा रेमडेसिवीर पुरवठा करणे हे आमचे प्राधान्य आहे.
सरकारच्या नोंदीनुसार ईओयूचे केवळ एक युनिट आणि सेझमध्ये एक आहे. आम्ही रेमडेसिवीरच्या सर्व उत्पादकांपर्यंत पोहचलो आहोत आणि कोणताही रेमडेसिवीरचा साठा अडवण्यात आलेला नाही. मी आपणास विनंती करतो आपण सांगितलेल्या या 16 कंपन्यांची यादी, स्टॉकची उपलब्धतेची माहिती सादर करा. आमचे सरकार लोकांच्या मदतीसाठी सर्व काही करण्यास वचनबद्ध आहे, असेही मांडवीय यांनी म्हटले आहे.
अशा प्रकारचे निराधार आरोप करण्याऐवजी नवाब मलिक यांनी पुरावा द्यावा; अन्यथा माफी मागावी. परिस्थिती बिकट असून, महाविकास आघाडी सरकारने दोषारोपाचे खेळ थांबवावेत आणि कोरोना परिस्थिती हाताळावी. ही जर राज्य सरकारची अधिकृत भूमिका असेल, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पुढे यावे आणि वस्तुस्थिती स्पष्ट करावी. नाही तर अशा प्रकारचे निराधार आणि बेजबाबदार आरोप करण्यापासून आपल्या मंत्र्यांना थांबवावे.
-केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, प्रदेश भाजप