Breaking News

कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशात कोरोनाचे संकट गंभीर झालेले असताना उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कुंभमेळा सुरू असून, लाखो भाविक हरिद्वारमध्ये जमले आहेत. कुंभमेळ्यातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून संवाद साधून कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याची विनंती केली.
हरिद्वारमधील कुंभमेळ्यात अनेक साधू आणि भाविकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या धार्मिक सोहळ्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुना आखाडाचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याकडे कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. ‘आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी आज फोनवरून संवाद साधला. सर्व संतांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करीत आहेत. याबद्दल मी संतांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर मी विनंती केली की, दोन शाही स्नान झाले आहेत आणि कोरोनाच्या संकटामुळे कुंभमेळा आता प्रतिकात्मक पद्धतीने व्हावा. यामुळे संकटाशी लढण्याला ताकद मिळेल’, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटनंतर स्वामी अवधेशानंद गिरी यांनीही ट्विट केले आहे. ‘पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा आम्ही सन्मान करतो. जीवनाची रक्षा करणे मोठे पुण्य आहे. माझा जनतेला आग्रह आहे की, कोरोना परिस्थिती बघता मोठ्या संख्येने स्नान करण्यासाठी येऊ नये. त्याचबरोबर नियमांचे पालन करावे,’ असे स्वामी अवधेशानंद यांनी म्हटले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply