Breaking News

हापूस आंब्याची आवक घटली

नवी मुंबई : प्रतिनिधी

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाडव्याला आंब्याची विक्री व आवक झाली होती, मात्र पाडव्यानंतर आवक वाढण्याऐवजी कमी झाली असून मागणीदेखील कमी झाली आहे. कोरोना, अवकाळी पाऊस, बदलते हवामान यामुळे आवक 50 टक्क्यांनी घटली. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने भाव वाढले असून, यंदा पाडव्याला वाढीव दरातच आंबा खरेदी करावा लागला.

गेल्यावर्षी या काळात आंब्याची किंमत 500 ते 700 रुपये डझन इतकी होती. एप्रिलच्या मध्यापर्यंत साडेतीनशे रुपयांपर्यंत खाली उतरणारे आंब्याचे दर यंदा 700 ते 1100 रुपये डझन इतकेच राहिले आहेत. एप्रिल मध्यावर आला तरीही आंब्याचे दर चढेच आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंब्याचे भाव थोडे खाली उतरतील, असे व्यापार्‍यांनी सांगितले.

यंदा आवक काम झाल्याने शेतकरी हवालदिल झाले तर दुसरी कडे ग्राहकांनीदेखील पाठ फिरवल्याने व्यापारी चिंतातुर झाले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्नाटक, हैदराबाद येथून आंब्याची आवक होत आहे.

दरवर्षी डिसेंबर, जानेवारीपासून बाजारात सर्व ठिकाणांहून वेगवेगळ्या जातीचे आंबे यायला लागतात. यात कोकणातील हापूस आंब्याचे प्रमाण अत्यल्प असते. मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापासून हापूसची आवक वाढायला सुरुवात होते आणि एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात हा आंबा बाजारात येतो. एप्रिलमध्ये 15 हजार पेट्यांच्या पुढेच आंब्याची आवक पाहायला मिळते. तोपर्यंत तोतापुरी, बदामी हे दक्षिण भारतातील आणि कर्नाटकमधील आंब्याची आवक सुरू होते. यात कर्नाटकी आंबा सर्वात जास्त प्रमाणात बाजारात येतो. मात्र यावेळी इतर आंब्यांना मागे टाकत कोकणातील हापूस आंब्याने बाजारात हजेरी लावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे एप्रिलच्या  दुसर्‍याच आठवड्यातच बाजारात हापूस आंब्याच्या 27 हजार 755  पेट्यांची आवक झाली आहे. ही आवक सिंधुदुर्ग, वेंगुर्ले, देवगड, रत्नागिरी, मालवण, मुरूड-जंजिरा येथून होत आहे.

इतर आंब्यांची आवकही नऊ हजार 517  क्रेट झाली आहे. हापूसची आवक लवकर झाली असली त्यास अद्याप आवश्यक मागणी नाही. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असल्याने हापूससाठी ते हात आखडता घेत आहे. अवकाळी पाऊस, हवामानात होणार्‍या बदलामुळे आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. वाढलेल्या तापमानाचा फटका आंब्याला बसला. उन्हाच्या तीव्र झळांनी आंबे गळून पडले. परिणामी आवक घटली, अशी माहिती व्यापारी वर्गाने दिली.

आंब्याचे दर

देवगड हापूस- 2000-3000 / चार डझन

कर्नाटक हापूस- 180-200 / एक किलो

कर्नाटक हापूस हलका प्रतीचा- 80-130 

केशर- 100- 200

तोतापुरी-  40- 50

लालबाग- 40-60

बदाम- 50-70

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात आंब्याची आवक 50  टक्के कमी आहे, त्यामुळे दर वाढले असले तरीदेखील मागणीत वाढ झालेली नाही. कडक निर्बंधांमुळे ऑनलाइन पद्धतीने आंबा विक्रीकडे कल वाढू लागला आहे.

-भरत देवकर, शिव सहकार सेने विभाग संघटक, एपीएमसी विभाग, फळ व्यापारी

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply