मुंबई ः प्रतिनिधी
आयपीएल 2021 स्पर्धेत दिल्ली संघातून खेळण्यार्या शिखर धवनने आपल्या नावावर ऑरेंज कॅप केली आहे. काही तास बंगळुरुच्या ग्लेन मॅक्सवेलच्या डोक्यावर मानाची कॅप राहिली, मात्र पंजाबविरुद्ध धवनने चांगली कामगिरी करीत ऑरेंज कॅपचा मान पटकावला.
यापूर्वी धवनने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात 54 चेंडूंत 85 धावांची खेळी केली होती. त्यात 10 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता, मात्र धवनची बॅट राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चालली नाही. त्याने 11 चेंडूंत केवळ नऊ धावा केल्या आणि तंबूत परतला, परंतु पंजाबविरुद्धच्या सामन्यात धवनने आक्रमक खेळी केली. त्याने 49 चेंडूंत 92 धावा केल्या. त्यात 13 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेलला अवघ्या काही तासांसाठी ऑरेंज कॅपचे सुख घेता आले. तिन्ही सामन्यांत मिळून त्याच्या 186 धावा आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाज हर्षल पटेलला पर्पल कॅपचा मान मिळाला. त्याने आतापर्यंतच्या तीन सामन्यात एकूण नऊ गडी बाद केले आहेत. पटेलने मुंबईविरुद्धच्या सामन्यात चार षटके टाकली. त्यात 27 धावा देत त्याने पाच गडी बाद केले. हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही कर्णधार विराट कोहलीने त्याच्यावर विश्वास कायम ठेवत चार षटके दिली. त्यात त्याने 25 धावा देत दोन गडी बाद केले. कोलकाताविरुद्धच्या सामन्यातही त्याने चांगली कामगिरी केली. चार षटकांत 17 धावा देत दोन गडी बाद केले. या तिन्ही सामन्यात त्याने एकूण नऊ गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला पर्पल कॅप देऊन सन्मानित करण्यात आले.
राहुल ठरला कमनशिबी
पंजाब किंग्जचा कर्णधार के. एल. राहुल पुन्हा एकदा कमनशिबी ठरला. मुंबईत खेळल्या गेलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात राहुलने अर्धशतक ठोकले, पण त्याच्या संघाला पराभव पत्करावा लागला. 2018पासून पराभव स्वीकारणार्या संघाकडून सर्वाधिक वेळा 50पेक्षा जास्त धावा करणार्यांमध्ये राहुलने अग्रस्थान मिळवले आहे.
Check Also
आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …