नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
येथील महानगरपालिका क्षेत्रातील 49 केंद्रांवर कोविड लसीकरण केले जात असून दररोज साधारणत: सात हजाराहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत एक लाख 75 हजार 873 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. त्यामध्ये शासनाकडून आणखी 20 हजार कोविशिल्ड लसींचा साठा प्राप्त झालेला असून सर्व लसीकरण केंद्रांवर चांगला प्रतिसाद लाभत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली या तीन रुग्णालयांत अहोरात्र लसीकरण करण्यात येत आहे, तसेच तुर्भे येथील रामतनु माता बाल रूग्णालय आणि सर्व 23 नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण केले जात आहे. त्यासोबतच वाशी सेक्टर 5 येथील ईएसआयएस रुग्णालयामधील जम्बो लसीकरण केंद्रामध्ये 4 बूथ सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत कार्यरत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व केंद्रांवर आठवड्याचे सातही दिवस मोफत लसीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 21 खाजगी रुग्णालयांमध्येही शासनाने निश्चित केलेल्या 250 रुपये प्रति डोस दराने लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन झाल्यानंतर दुसरा डोस सहा ते आठ आठवडे कालावधीमध्ये घ्यावयाचा आहे.ज्यांनी कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी दुसराही डोस कोव्हॅक्सिनचाच घेणे आवश्यक असून तो चार ते सहा आठवडे कालावधीमध्ये घ्यावयाचा आहे. कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेण्याची सुविधा वाशी, नेरूळ व ऐरोली येथील महापालिका रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन यापैकी ज्या लसींचा पहिला डोस घेतला आहे. त्याच लसीचा दुसरा डोस विहित कालावधीमध्ये घ्यावयाचा आहे.