नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
शहरातील वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी पालिकेकडून चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. त्याकरिता आवश्यक ठिकाणी मोफत चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. चाचणीकरिता नागरिकांची गर्दी होेत आहे. या रांगांमधूनही कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे. किरकोळ लक्षणांमुळे चाचणीसाठी येणार्यांकडून एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवता गर्दी केली जात आहे. त्यामुळे चाचणीच्या ठिकाणीही अनेकांचा संसर्ग होऊन कोरोना अधिक पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवी मुंबईतल्या रहिवासी वर्गासह नोकरी व्यवसाय निमित्ताने नवी मुंबईत येणारेही चाचणीला रांगा लावत आहेत. यामुळे प्रत्येक चाचणी केंद्रावर लांब रांगा लागत आहेत. त्यात थोडी-फार लक्षणे असलेल्यांसह कसलाही त्रास नसल्याने केवळ नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी निगेटिव्ह प्रमाणपत्राची गरज असल्याने चाचणीसाठी आलेल्यांचाही समावेश असतो. या दरम्यान, लागणार्या लांब रांगांमध्ये कोणत्याही प्रकारचे सुरक्षित अंतर ठेवले जात नाही. त्यामुळे एखाद्या कोरोना संक्रमित इतरांनाही संसर्ग पसरवू शकतो. परिणामी, त्या चाचणीत निगेटिव्ह आलेली व्यक्ती पुढील काही दिवसात चाचणीदरम्यान झालेल्या संसर्गामुळे बाधित होऊ शकते. अशा प्रकारातून निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन फिरणारी व्यक्तीही नकळतपणे अनेकांना संसर्ग पसरवू शकते. त्यामुळे कोरोना चाचणीच्या ठिकाणी अधिक खबरदारी घेतली जाण्याची गरज निर्माण झाली आहे, परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्याने व चाचणी केंद्राच्या ठिकाणी अपुर्या जागा व सुविधांमुळे तिथे येणार्यांचीही गैरसोय होत असल्याने नागरिकांना गर्दी करूनच रांग लावावी लागत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेकडून होत असलेल्या चाचणीच्या वेळी चाचणीला आलेल्या व्यक्तीच्या आधार कार्डवरील पत्ता तपासला जावा, अशी मागणी होत आहे. शहराबाहेरील अधिकाधिक व्यक्ती चाचणीच्या रांगेत असल्याने स्थानिक रहिवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसाय निमित्ताने नवी मुंबईत येऊन चाचणी करून घेणार्यांची पर्यायी सोय करण्याची मागणी होत आहे.