नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या वेगाने पसरत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना विरुद्धच्या सुरू असलेल्या लढाईवरुन केंद्र सरकारच्या रणनीतीवरुन काँग्रेसकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरून राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि त्यांचे कुटुंब हे कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी नाहीये, असा टोला भाजप नेते राज्यवर्धन सिंग राठोड यांनी केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी या मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर आता भाजप नेते राज्यवर्धन सिंग राठोड यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींवर निशाणा साधत चोख प्रत्युत्तर दिले आहे. राज्यवर्धन राठोड यांनी म्हटले, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना विनंती करतो की, त्यांनी अशा प्रकारची टिप्पणी करू नये. तुम्ही खासगी कंपन्यांना दोष देत आहेत ज्या कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी आहेत. देशाचा प्रत्येक नागरिक या लढाईत सहभागी आहे केवळ राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि त्यांचे कुटुंब हे कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी नाहीये. राज्यवर्धन राठोड यांनी पुढे म्हटले, आता राज्यस्थानमध्ये बेड्स, औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दारूची विक्री खुलेआम होत आहे पण बाजारपेठा बंद आहेत. ही कोरोनाविरुद्ध लढाईसाठी राज्य सरकारची तयारी आहे का? राहुल गांधींनी आरोप केला होता की, केंद्र सरकारकडून सुरू असलेली लसीकरण मोहीम ही नोटबंधीपेक्षा कमी नाहीये कारण या लसीकरणासाठी नागरिकांना रांगेत उभे रहावे लागत आहे, त्यांचे पैशांचे नुकसान होत आहे आरोग्य धोक्यात आहे.