Breaking News

चेन्नईच्या विजयाची हॅट्ट्रिक; कोलकातावर मात करून गुणतक्त्यात अव्वल स्थानी

मुंबई ः प्रतिनिधी

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सवर 18 धावांनी मात करीत विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली. मुंबईच्या वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यात चेन्नईने 20 षटकांत 3 बाद 220 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताचा डाव 202 धावांवर संपुष्टात आला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. चेन्नईचा सलामीवीर फाफ डु प्लेसिसला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. चेन्नईच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. दीपक चहरने पहिल्याच षटकात शुबमन गिलला बाद केले. त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर पुढच्या षटकात दीपकने नितीश राणाला (9) माघारी धाडले. कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गनही अपयशी ठरला. चहरने त्याला बाद केले. याच षटकात चहरने सुनील नरिनलाही बाद करीत कोलकाताला अजून संकटात टाकले. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात लुंगी एनगिडीने राहुल त्रिपाठीला बाद केले. त्रिपाठीला आठच धावा करता आल्या. पाच फलंदाज बाद झाल्यानंतर आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक यांनी चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. 10व्या षटकात या दोघांनी 25 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. रसेलने चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई करीत 21 चेंडूंत अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतर रसेल हा सॅम करनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. त्याने 22 चेंडूंत तीन चौकार आणि सहा षटकारांसह 54 धावांची खेळी केली. रसेलनंतर कार्तिकही वैयक्तिक 40 धावांवर बाद झाला. एनगिडीने त्याला पायचित पकडले. कार्तिकनंतर पॅट कमिन्सने आक्रमणाला सुरुवात केली. त्याने सॅम करनच्या 15व्या षटकात 24 धावा कुटत अपेक्षित धावांचे अंतर कमी केले. 18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कमिन्सने दोन धावा घेत 23 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात कोलकाताला 20 धावांची गरज असताना प्रसिध कृष्णा पहिल्या चेंडूवर धावबाद झाला आणि कोलकाताचा डाव 202 धावांवर संपुष्टात आला.  कमिन्सने 34 चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांसह 66 धावांची नाबाद खेळी केली. तत्पूर्वी, मराठमोळा फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी चेन्नईच्या डावाची दमदार सुरुवात केली. पहिल्या पाच षटकांत या दोघांनी चेन्नईच्या 44 धावा फलकावर लावल्या. मागील काही सामन्यांपासून फ्लॉप ठरलेल्या ऋतुराजने आयपीएलमधील आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. आक्रमक झालेला ऋतुराज अर्धशतकानंतर बाद झाला. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याला बाद केले. ऋतुराजने सहा चौकार आणि चार षटकारांसह 64 धावांची खेळी केली. ऋतुराजपाठोपाठ प्लेसिसने अर्धशतक पूर्ण केले. ऋतुराजनंतर मैदानात आलेल्या मोईन अलीने आक्रमक फलंदाजी केली. त्याने डु प्लेसिससोबत 26 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी रचली. कोलकाताचा फिरकीपटू सुनील नरिनला मोठा फटका खेळण्याच्या नादात तो यष्टिचीत झाला. अलीने 12 चेंडूंत 25 धावा ठोकल्या. अलीनंतर धोनी मैदानात आला. आठ चेंडूंत 17 धावा करून तो तंबूत परतला. रसेलच्या गोलंदाजीवर मॉर्गनने त्याचा अप्रतिम झेल टिपला. शेवटच्या षटकात डु प्लेसिसने पॅट कमिन्सला दोन षटकार ठोकले, मात्र, त्याला शतक पूर्ण करता आले नाही. त्याने 60 चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 95 धावांची खेळी केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply