Breaking News

रायगडात रेड अलर्ट

अतिवृष्टीचा इशारा; दोन दिवस धोक्याचे

अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 13) पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी हवामान खात्याने पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, दोन दिवस पडलेल्या पावसाने नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत.
जिल्ह्याच्या बहुतांश भागात सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. दुपारी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूर ओसरला, मात्र सखल भागातील पाणी कायम होते. संध्याकाळी पुन्हा पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केली. त्यामुळे जिल्ह्यातील सावित्री, कुंडलिका, अंबा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती. मंगळवारी पहाटे पुन्हा पावसाचा जोर कमी झाल्याने पाणीपातळी घटली. असे असले तरी सकाळपासून अधूनमधून पावसाच्या किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या.
पुढील दोन दिवस (दि. 14 व 15) जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हवामान खात्याने रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची एक तुकडी मुरूडमधील नांदगाव येथे तैनात करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मागील दोन दिवस बरसत असलेल्या पावसाने जिल्ह्यात दोन बळी घेतले आहेत. काशीद येथील पूल दुर्घटनेत विजय चव्हाण या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर नांदगाव परिसरात पूरग्रस्तांच्या मदतीला धावलेले तलाठी संजय भगत यांच्या मोटरसायकलला अपघात होऊन त्यांचाही मृत्यू झालाय.
एसटी बसचालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ
महाड ः मुसळधार पावसात एक एसटी बसचालक प्रवाशांच्या जीवाशी खेळला असल्याचे महाडमध्ये समोर आले आहे. महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथील नागेशवरी बंधारा सोमवारी ओव्हरफ्लो असताना चालकाने बस पुराच्या पाण्यातून पलीकडे नेली. सुदैवाने बंधारा पार करून गाडी सुखरूप नेण्यात चालक यशस्वी ठरला. अन्यथा चालकाचे हे धाडस त्याच्यासह प्रवाशांच्या जीवावर बेतू शकले असते. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
दरडी कोसळण्याचे सत्र जिल्ह्यात सुरूच
खालापूर, मुरूड : रायगड जिल्ह्यात दोन दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत. खोपोली तसेच पुन्हा एकदा मुरूडमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली.
खोपोलीत काजूवाडीच्या टेकडीचा काही भाग मंगळवारी रात्री महामार्गावर कोसळला. ही घटना समजताच खोपोली नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पोलीस, पत्रकार, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुपचे सदस्य, वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोचले. त्यानंतर अय्यर ब्रिगेडची टीम पाचारण करून रातोरात मलबा हटवण्यात आला.
दुसरी घटना मुरूडमध्ये घडली. सध्या मुरूडकडे येण्यासाठी एकमेव असलेल्या भालगाव मार्गावरील सावली आणि मिठागरदरम्यान दरड कोसळली. त्यामुळे हाही मार्ग बंद झाला. याआधी  पूल कोसळल्याने काशीदमार्गे येण्यासाठी रस्ता बंद आहे. केळघर मार्गही दरड कोसळल्याने बंद आहे, तसेच उसरोली नदी जलमय झाल्याने तोही मार्ग बंद ठेवण्यात आला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply