आमदार महेश बालदींकडून तात्पुरत्या बेडसाठी जागांची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील व उरण विधान सभा मतदार संघातील उलवे नोडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअनुषंगाने येथील कोरोनाबाधित रुग्णांसाठी याच परिसरात तात्पुरत्या स्वरुपातील कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन होत आहे. यासाठी आमदार महेश बालदी यांनी गव्हाण येथील मोरु नारायण म्हात्रे विद्यालयासह विविध जागांची पाहणी केली. येेथे 60 बेडचे तात्पुरते हॉस्पिटल येत्या गुरुवारपर्यंत सुरू करण्यात येणार आहे.
या पाहणीच्या वेळी वहाळ ग्रामपंचायत उपसरपंच अमर म्हात्रे, सदस्य वितेश म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, तसेच मदन पाटील, अश्विन नाईक, प्रणय कोळी व विविध समाजसेवी बांधव व डॉक्टर्स व मेडिकल असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशानुसार येत्या आठवडाभरात शासनाच्या मान्यतेने उलवे नोड येथे कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याचे आमदार महेश बालदी यांनी सांगितले. या कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा या आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून अथवा त्यांच्या स्वखर्चाने देण्यात येणार आहेत.