मुंबई ः प्रतिनिधी
आयपीएलच्या 14व्या हंगामात काही परदेशी खेळाडूंनी स्पर्धेच्या मधूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यात अधिकतर खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत. आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार्या ऑस्ट्रेलियन खेळाडूने आपल्या देशातील बोर्डाला चार्टर्ड प्लेनची सोय करण्याची मागणी केली आहे.
मुंबई इंडियन्सकडून खेळणार्या ख्रिस लीन या खेळाडूने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विनंती केली आहे की, त्यांनी खेळाडूंना घेऊन जाण्यासाठी चार्टर विमानाची सोय करावी. लीन म्हणाला, या संदर्भात मी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला एक पत्र लिहले आहे. खेळाडू प्रत्येक वर्षी कराराच्या माध्यमातून 10 टक्के पैसे कमावतात. आमच्याकडे या पैशाचा या वर्षात वापर करण्याची संधी आहे. जेव्हा ही स्पर्धा संपेल तेव्हा चार्टर्ड विमानाची सोय करावी.
‘मी आयपीएलचा कालावधी कमी करा असे म्हणणार नाही. कारण या धोक्याची कल्पना सर्वांना पहिल्या पासून होती आणि त्यानंतरच आम्ही करारावर स्वाक्षरी केली. माझे फक्त इतकेच म्हणणे आहे की, स्पर्धा संपल्यानंतर घरी परतण्यासाठी विमानाची सोय केल्यास बरे होईल,’ असेही लीन याने म्हटले आहे.