नितीन मेनन, पॉल रेफेल घरी परतले
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आयपीएलवरील कोरोना संकट आता आणखी गडद होत चालले आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक परदेशी खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडत असताना आता पंचदेखील माघार घेताना दिसत आहेत. आयसीसीच्या एलिट पॅलनमधील सदस्य असलेले भारताचे नितीन मेनन व ऑस्ट्रेलियाचे पॉल रेफेल यांनी वैयक्तीक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.
नितीन मेनन यांच्या मातोश्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मेनन यांनी स्पर्धेतून माघार घेतली असून ते इंदौर येथील त्यांच्या राहत्या घरी परतले आहेत, तर पॉल रेफेल यांनी ऑस्ट्रेलियन सरकारने भारतीय विमानांवर घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमधून आतापर्यंत पाच खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य फिरकीपटू आर. अश्विनचादेखील समावेश आहे. अश्विनच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या लियाम लिव्हिंगस्टोने बायो बबलचा त्रास होत असल्याने माघार पत्करली.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे अॅडम झम्पा, अँड्र्यू टाय आणि केन रिचर्डसन यांनी भारतातील कोरोनावाढीच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. नितीन मेनन यांना लहान मूल आहे आणि त्यांच्या मातोश्रीसह पत्नीदेखील कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे लहान मुलासोबत राहणे हे प्राधान्य असल्यामुळे त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे, तर रेफेल यांना ऑस्ट्रेलियन सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मायदेशी परतता येणार नाही अशी भीती आहे. बीसीसीआयने याआधीच बॅकअप प्लान म्हणून भारतीय पंचांची नियुक्ती केलेली आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकार्याने दिली आहे.
दरम्यान, बीसीसीआयचे अंतरिम सीईओ हेमंग अमीन यांनी आयपीएलमधील सर्व संघांना एक पत्र लिहिले आहे. यात स्पर्धेशी निगडित सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ, प्रशिक्षक, पंच, समालोचक, व्यवस्थापक या सर्वांना स्पर्धा संपल्यानंतर सुखरूप घरी पोहचवणे ही बीसीसीआयची जबाबदारी आहे, असे आश्वासन सर्व संघांना देण्यात आले आहे.