पनवेल : प्रतिनिधी : आज समाजात बाप, चुलता आणि मामा यासारख्या जवळच्या नातेवाईकांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना आपण वाचत असतो. अशा वेळी खारघरमधील बापाने आपल्या तरुण मुलीचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःची किडनी दान करून तिचे प्राण वाचवून आठ वर्षीय प्रेरणाला आईविना पोरकी होण्यापासून वाचवून समाजापुढे एक आदर्श ठेवला. याबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
मणीलाल हरिभाई वाळंद वय 56 वर्षे यांचे कामोठ्यामध्ये सलून आहे. ते आपल्या कुटुंबासह खारघर सेक्टर 20 मध्ये राहतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांची मुलगी दीपिका जिग्नेश लिंबची वय 33 ही आपली आठ वर्षाची मुलगी प्रेरणा आणि पती जिग्नेशसह खारघरमध्येच राहते. पतीचेही खारघरमध्ये सलून आहे. दीपिकाला पाच वर्षापूर्वी किडनीचा विकार असल्याचे लक्षात आले. त्यावर अनेक ठिकाणी औषधोपचार करण्यात आले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तिला डॉक्टरांनी अडीच वर्षांपासून डायलेसिस करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी मोठा खर्च येत होता. त्यातच तिचा आजार वाढल्याने बेलापूर येथील आपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर रवींद्र निकाळजे आणि सर्जन अमोलकुमार पाटील यांनी तिची किडनी बदलण्याचा सल्ला दिला. त्यासाठी नोंदणी करून ठेवण्यास सांगितले.
किडनीसाठी नोंदणी केल्यास नंबर लागण्यास वेळ लागेल. त्यामध्ये दीपिकाच्या जीवाला धोका असल्याने मणीलाल, त्यांची पत्नी आणि जावई जिग्नेश यांनी आपली किडनी देण्याची तयारी दाखवली. मणीलाल आणि दीपिका यांचा रक्तगट एबी+ असल्याने जुळत होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने त्यांना परवानगी दिली, पण दीपिकाने आपल्या वडिलांच्या जीवाला धोका होईल म्हणून नकार दिला. अखेर डॉक्टरांनी तिची समजूत घातली की त्यांना काही होणार नाही. एक आठवड्यात ते फिरू शकतील. त्यांची काळजी करू नकोस, मग ती तयार झाली. 11 मार्च रोजी आपोलो हॉस्पिटलमध्ये किडनी बसवण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. आपल्या मुलीला किडनी देऊन तिचे प्राण वाचवून समाजापुढे एक आदर्श ठेवल्याबद्दल अनेक सामाजिक संस्थांनी मणीलाल यांचा घरी येऊन सत्कार केला.