चिपळे, कुंडेवहाळ, कर्नाळ्याचा आज लागणार निकाल
पनवेल : बातमीदार
तालुक्यातील चिपळे, कुंडेवहाळ आणि कर्नाळा या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 24) उत्साहात मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार 75 ते 80 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक यंत्रणेकडून सूचित करण्यात आले. सदस्यपदाच्या
उमेदवारांपैकी 3 ग्रामपंचायतींचे एकूण 9 उमेदवार याअगोदरच बिनविरोध निवडून आलेले आहेत. यामध्ये काही सदस्यांसाठीही ही निवडणूक तितकीच महत्त्वाची असली तरी खरी रणधुमाळी ही सरपंचपदाच्या उमेदवारासाठी होत आहे. कर्नाळा ग्रामपंचायतीमध्ये एकूण 5 प्रभाग व 9 मतदान केंद्रे आहेत, तर चिपळे ग्रामपंचायतीमध्ये 4 प्रभाग आणि 8 मतदान केंद्रे तसेच कुंडेवहाळ ग्रामपंचायतीमध्ये 3 प्रभागांमध्ये 3 मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती. सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर मतदानासाठी मोठी गर्दी झाल्याचे
दिसून आले. चिपळे ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1मधून 2 सदस्य, प्रभाग 2मधून 3 सदस्य, तर प्रभाग 3 मधून 2 सदस्य असे एकूण 7 सदस्यपदासाठीचे उमेदवार, तर कुंडेवहाळ ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 मधून दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कर्नाळा ग्रामपंचायतीमध्ये एकही सदस्य बिनविरोध नसल्यामुळे येथील निवडणूक चुरशीची ठरणार आहे. सरपंचपदासाठी कर्नाळा ग्रामपंचायतीमध्ये म. साबीर इकबाल दळवी आणि गणेश पांडुरंग पाटील यांच्यात थेट लढत होत असून कुंडेवहाळ ग्रामपंचायतीमध्ये सदाशिव वास्कर आणि मिथुन मधुकर भोईर यांच्यात आणि चिपळे ग्रामपंचायतीसाठी कविता संदीप शीद आणि सविता राजू हिंदोळा या दोन उमेदवारांमध्ये सरपंचपदाची लढत होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर तीनही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी सोमवारी (दि. 25) पनवेल तहसील कार्यालयात होणार आहे.