महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष; जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
रेवदंडा : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यात जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सरकारी जागावर अतिक्रमण करून त्या बळकावण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. तालुक्यातील रेवदंडा समुद्रकिनारीदेखील अशा प्रकारे सरकारी जागेवर पक्क्या स्वरूपाची बांधकामे करण्यात येत असून, ही बेकायदेशीर बांधकामे तातडीने हटवावीत, अशी मागणी केतन तारकर यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रेवदंडा समुद्रकिनारी पुलालगत असलेली जागा मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारीत येते. या जागेवर सध्या अनेक बांधकामे सुरू आहेत. सिमेंट व दगडांचा वापर करून तीन प्रकारचे जोती (पाया) बांधून पुर्ण झाली आहेत. काही जोती (पाया) विकल्याची माहिती समोर आली आहे. जवळच एकमजली घराचे बांधकाम केले आहे. त्यासाठी कोणत्याही कार्यालयातून परवानगी घेतलेली नाही. ही बांधकामे करताना सीआरझेड कायद्याचे उल्लघंन करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे ही बांधकामे रेवदंडा तलाठी कार्यालयापासून केवळ 150 मीटर अंतरावर असून भरती रेषेपासून अवघ्या तीस मीटर अंतरावर आहेत. असे असूनदेखील संबधीत तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडून कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप केतन तारकर यांनी केला आहे.
संबधीत बेकायदेशीर जोत्यांची बांधकामे वेळीच थांबविली नाही तर त्यावर पक्क्या स्वरूपाची बांधकामे उभी राहतील व त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यास मोठा विलंब होईल. या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई न झाल्यास नाईलाजाने न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा केतन तारकर यांनी या निवेदनात दिला आहे.
या बेकायदेशीर बांधकामांसंदर्भात अलिबागच्या तत्कालीन प्रातांधिकारी शारदा पोवार यांनी कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती.
दरम्यान, त्यांची बदली झाली तसेच लॉकडाऊन लागू झाला. मात्र आता संबधीत यंत्रणेने या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी केतन तारकर यांनी निवेदनात केली आहे.
रेवदंडा समुद्रकिनारी करण्यात आलेल्या बांधकामासंदर्भात आलेली तक्रार तपासून पाहिली जाईल. जर ही बांधकामे अनधिकृत असतीत तर त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल.
-सचिन शेजाळ, तहसीलदार, अलिबाग