Breaking News

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रमेश पोवार

मुंबई ः प्रतिनिधी
भारताचे माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डब्ल्यू. व्ही. रामन यांच्याकडून ते प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतील. एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राज हिच्याशी झालेल्या वादामुळे दोन वर्षांपूर्वी पोवार यांना प्रशिक्षक पदावरून निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे क्रिकेट जगतात या निर्णयाकडे आश्चर्याने पाहिले जात आहे.
मदन लाल यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) रामन यांच्यासहित आठ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर पोवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. ‘भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी रमेश पोवार यांची नियुक्ती करीत असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) करीत आहे. या पदासाठी जाहिरात दिल्यानंतर तब्बल 35 उमेदवारांनी अर्ज केले होते,’ असे बीसीसीआयच्या पत्रकात म्हटले आहे.
माजी यष्टीरक्षक अजय रात्रासह चार पुरुष उमेदवार तसेच माजी निवड समिती सदस्य हेमलता काला यांच्यासह चार महिला उमेदवार प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते.
आता पुढील वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची बांधणी करण्याचे मुख्य आव्हान पोवार यांच्यासमोर असणार आहे. भारतीय महिला संघ जून महिन्यात इंग्लंड दौर्‍यावर आणि त्यानंतर विश्वचषक स्पर्धेआधी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरही जाणार आहे.

मला संधी दिल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तसेच क्रिकेट सल्लागार समितीचा मी आभारी आहे. भारतीय महिला क्रिकेटला वेगळी दिशा देण्यासाठी मी उत्सुक आहे.
-रमेश पोवार

Check Also

पनवेलजवळील करंजाडे येथे शुद्ध पाण्याचा प्रकल्प

माफक दरात सेवा; नागरिकांची भागणार तहान पनवेल : रामप्रहर वृत्तनांदी व सनोफी फाउंडेशनच्या वतीने पनवेलजवळील …

Leave a Reply