Breaking News

टीम इंडिया येणार मुंबईत

इंग्लंड दौरा करण्यापूर्वी क्वारंटाइन होणार

मुंबई ः प्रतिनिधी
इंग्लंडला जाणार्‍या भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू क्वारंटाइनमध्ये राहण्यासाठी 19 किंवा 24 मे रोजी मुंबईत एकत्र येऊ शकतात. भारतीय संघ 2 जूनला चार्टर्ड विमानाने इंग्लंडला रवाना होणार आहे. यापूर्वी संघाला क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल.
19 मे रोजी हे खेळाडू मुंबईत येऊन दोन आठड्यांसाठी क्वारंटाइन राहतील आणि इंग्लंडला निघतील अशी चर्चा होती, मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडूंना 24 मेचाही पर्याय दिला आहे. दोन तारखांवर चर्चा झाली असून, येत्या काही दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाबाधित झाल्याने इंग्लंडने भारताला लाल यादीमध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू आणि कर्मचार्‍यांना इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतरही 10 दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल. या मुक्कामादरम्यान त्यांच्या कोरोना चाचण्यादेखील केल्या जातील.
क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर आणि चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला चार दिवसांचा सराव करण्याची संधी मिळेल. 18 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यानंतर हा संघ एका महिन्यापेक्षा जास्त काळ कोणताही सामना न खेळता तिथेच राहील. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
योजनेनुसार संघ दोन चार दिवसीय आंतरसंघ सामने खेळेल. कोरोना निर्बंधामुळे त्यांना काऊंटी संघाबरोबर सराव सामने खेळता येणार नाहीत. आंतरसंघात होणार्‍या सामन्यांचे ठिकाण लवकरच जाहीर केले जाईल.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply