Breaking News

बाप्पा, या पार्थला सुबुद्धी दे! बूट घालूनच घेतले देवदर्शन, दादापुत्र पुन्हा एकदा ट्रोल

कर्जत : बातमीदार

मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ पवार हे कर्जत दौर्‍यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पाच संवाद सभा पूर्ण करून सहाव्या सभेसाठी जात असताना रस्त्यात असलेल्या गणेश मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर गणपती बाप्पाला हार घातला आणि ते निघून गेले, पण त्या वेळी त्यांचे व्हायरल झालेले फोटो यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर सर्वदूर पार्थ पवार यांच्या गणेश दर्शनाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, त्या फोटोबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. त्यामुळे संभ्रम अधिक

वाढला आहे.

अनेक कारणांनी सतत सोशल मीडियावर चर्चेत राहिलेले मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ अजित पवार हे आता आणखी एका फोटोमुळे पुन्हा सोशल मीडियासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. 12 एप्रिल रोजी कर्जत तालुका दौर्‍यावर प्रचारासाठी असताना पार्थ पवार हे कशेळे येथील संवाद सभा उरकून आपल्या शेवटच्या सभेसाठी रात्री साडेआठच्या सुमारास जाण्यास निघाले. मुरबाड रस्त्याने कर्जत खांडपे येथे जाण्यास निघालेले पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव यांच्या कडाव गावात थांबविण्यात आले. तेथे श्री बालदिगंबर गणेश मंदिरात असलेल्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पार्थ पवार गेले. त्या वेळी त्यांनी पुष्पहार गणेशाच्या मूर्तीला घातला आणि ते आपल्या शेवटच्या सभेसाठी निघाले, मात्र 13 एप्रिल रोजी पार्थ पवार यांनी काळ्या रंगाचे बूट पायात असताना श्री गणेशाच्या मूर्तीला पुष्पहार घातला असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मात्र पार्थ पवार यांच्या पायात बूट नव्हते, तर नायके कंपनीचे कटसॉक्स होते हे पटवून देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, तसेच अन्य मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर उत्तरे देताना नाकीनऊ आले आहे. विरोधकांनी तो फोटो सर्वत्र व्हायरल केला असल्याचा आरोप आघाडीचे कार्यकर्ते करीत आहेत, मात्र पार्थ पवार हे रात्री साडेआठच्या सुमारास कडाव येथील गणेश मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेले असताना त्यांचे फोटो हे तेथे उपस्थित असलेल्या आघाडीच्या उत्साही कार्यकर्त्यांनी काढले असतील हे तेवढेच खरे आहे, पण तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यावर नंतर होणार्‍या परिणामांची चिंता न केल्याने आता पार्थ पवार यांना न केलेल्या कृत्याबद्दल गणेशभक्तांचा रोष ओढवून घ्यावा लागत आहेत.

पार्थ पवार यांची सतत चर्चेत राहण्याची पद्धत आहे की अजाणतेपणाने हे घडले आहे यावर अद्याप कोणत्याही नेत्याकडून अधिकृत खुलासा झाला नाही. त्यामुळे पार्थ पवार यांच्याबाबत मतप्रवाह बदलले जाऊ शकतात, अशी भीतीदेखील राजकीय वर्तुळात आहे, कारण गणेशभक्तांच्या भावनांचा तो विषय बनला आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply