माथेरान : प्रतिनिधी
अमन लॉज ते माथेरान या मिनीट्रेनला चार डबे आहेत. त्यातून जेमतेम शंभर प्रवाशांची ने-आण करण्यात येते. पर्यटन हंगामात या डब्यांच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी होत आहे.
माथेरानमध्ये मोटार वाहनांना बंदी आहे. येथील मिनीट्रेन पर्यटकांचे खास आकर्षण आहे. नेरळ-माथेरान या मिनीट्रेनचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठ्या संख्येने माथेरानला येतात, मात्र नेरळ ते माथेरान मिनीट्रेन सेवा अद्यापही सुरू झालेली नाही. सध्या मिनीट्रेनची अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवा सुरू आहे. त्यामधून प्रवास करण्यासाठी पर्यटक धडपडत असतात, मात्र मिनीट्रेनची ही शटल सेवा फक्त चार डब्यांची आहे. त्यात जेमतेम शंभर प्रवाशांना जागा मिळते. सुट्यांच्या हंगामात या शटल सेवेच्या तिकिटांसाठी पर्यटकांची गर्दी होते. मात्र डबे कमी असल्याने अनेकांना तिकीट मिळत नाही. त्यामुळे त्यांचा हिरमोड होत आहे.
डब्यांची संख्या कमी असल्याने अनेक पर्यटकांना मिनीट्रेनच्या अमन लॉज ते माथेरान या शटल सेवेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे या शटल सेवेच्या डब्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी पर्यटकांतून होते आहे.