Breaking News

मुख्यमंत्री नुसत्या बाता मारताहेत

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

देवगड ः प्रतिनिधी
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसीय कोकण दौर्‍यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा करीत तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. देवगड येथे शुक्रवारी (दि. 21) प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केल्या जात असलेल्या टीकेचा फडणवीस यांनी समाचार घेतला. पंतप्रधान मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले असा सवाल करता? मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यांत का आले? इतर जिल्ह्यांत का जात नाही?, अशी विचारणा फडणवीस यांनी केली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री नुसत्या बाता मारीत आहेत, असे म्हटले.
विरोधी पक्षनेत्यांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत मी वैफल्यग्रस्त नसल्याचे म्हटले आहे. ठाकरेंच्या टीकेला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
‘याच्यावर मला काही राजकीय बोलायचे नाही; अन्यथा मीदेखील बोलू शकतो, पण मुख्यमंत्री आले याचे समाधान आहे. आम्ही त्याचे राजकारण करीत नाही, पण पंतप्रधान मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा सवाल करण्यात येतोय. मग येथे मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यांत का आले? वादळाचा फटका रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?, आम्हीही असाच सवाल करायचा का, अशी विचारणा फडणवीस यांनी केली.
पुढे ते म्हणाले की, तुम्ही येता आणि जाता. मागच्या वेळीदेखील येऊन गेलात. नुसत्या बाता मारत असून कोकणाला काही दिले नाही. गेल्या वेळचे निसर्ग चक्रीवादळाचे पैसेही यांनी दिलेले नाहीत आणि येथे येऊन राजकीय वक्तव्य करतात याचे आश्चर्य वाटते.
एनडीआरएफची टीम का तैनात ठेवली नाही?
एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की राजकारण करू नका, पण दुसरीकडे प्रत्यक्षात टीका करतात. मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आहे. केवळ तीन तासांचा दौरा आणि किती किलोमीटरचा दौरा हे मोजून सांगू का?, अशी विचारणा करीत वादळाची पूर्वसूचना असतानाही एनडीआरएफची टीम तैनात का ठेवण्यात आली नाही? कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे कधी होणार? नुकसानग्रस्तांना मदत कधी मिळणार? असे अनेकविध प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी उपस्थित केले.
मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ ‘दर्शनाचा’ कार्यक्रम
मुंबई ः तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 21) कोकणाचा दौरा केला. त्यांच्या या धावत्या दौर्‍यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. ‘कोकणात चक्रीवादळ नुकसानीची पाहणी..! विरोधी पक्षनेते तीन दिवस, मुख्यमंत्री तीन तास. विरोधी पक्षनेते कोकणवासीयांच्या बांधावर-उंबरठ्यावर जाऊन विचारपूस, मुख्यमंत्र्यांचा केवळ ’दर्शनाचा कार्यक्रम,’ असा टोला दरेकर यांनी ट्विटरवरून लगावला आहे.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply