Breaking News

हिंदू मुन्नानी संघटना, चंद्रकांत सोमपुरा यांना श्री गुरुजी पुरस्कार जाहीर; अलिबागमध्ये होणार पुरस्कार वितरण समारंभ

अलिबाग : प्रतिनिधी

रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील परमपूजनीय श्री गुरुजी पुरस्कार यंदा समाजप्रबोधन क्षेत्रात तामिळनाडूतील हिंदू मुन्नानी संघटना व कला क्षेत्रासाठी सुप्रसिध्द वास्तूविशारद चंद्रकांत बलवंतराय सोमपुरा यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व  सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अलिबागमधील कमळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात गुरूवारी (दि. 17) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत  रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी परम पूजनीय श्री गुरुजी पुरस्कार विजेत्यांची  नावे जाहीर केली. रायगड संघचालक यशवंत पाटील, कुलाबा जिल्हा जनकल्याण समिती अध्यक्ष अरूण दाते या वेळी उपस्थित होते. रा. स्व. संघाचे व्दितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्रीगुरूजी यांच्या स्मरणार्थ रा. स्व. संघ जनकल्याण समिती दरवर्षी श्री गुरूजींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने परम पूजनीय श्री गुरुजी पुरस्कार प्रदान करते. राष्ट्रीय जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणार्‍या व्यक्तींना अथवा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे यंदाचे हे 26 वर्ष आहे.  अलिबाग शहरातील पी.एन.पी. नाट्यगृहात 7 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात पुरस्कार्थींना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध  कला दिग्दर्शक नितीन देसाई हे  पुरस्कार प्रदान समारंभास  प्रमुख पाहुणे म्हणून तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकर्ते सुहासराव हिरेमठ  प्रमुख मार्गदर्शक म्हणून  उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती या वेळी डॉ. रवींद्र साताळकर यांनी दिली.

Check Also

‌‘एसआयआर‌’च्या उरण विधानसभा प्रमुखपदी डॉ. अविनाश गाताडे

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे …

Leave a Reply