गेल्या आठवड्यात बीटकॉईनच्या किमतीने किमान 30 ते 40 टक्के बुडी मारल्याने त्याच्या उच्चांकाला ज्यांनी खरेदी केली होती त्यांचे हात पोळले आहेत. त्यामुळे या चलनाचे नियंत्रण जोपर्यंत सरकारांतर्फे होत नाही, तोपर्यंत त्यातून मिळणार्या परताव्याचा मोह टाळला पाहिजे.
सर्व जगाचे व्यवहार ज्यावर अवलंबून आहेत, ती चलने कशी भरकटत चालली आहेत हे बीटकॉईन्सच्या ताज्या घडामोडीमुळे पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. ज्या चलनाचा जन्म होऊन तब्बल 12 वर्षे झाली आहेत, त्या आभासी चलनांचा प्रवास हा जगाच्या आर्थिक क्षेत्रावर प्रकाश टाकणारा आहे. जगाची आर्थिक दिशा गेली तीन-चार शतके जे पाश्चिमात्य विचार ठरवीत आहेत, ते जगाला टोकाला नेऊन ठेवत आहेत हेही आता स्पष्ट होऊ लागले आहे. सोन्याचा साठा आणि चलनाच्या एकूण मूल्याचा संबंध तोडून जगाने किती मोठी चूक केली आहे हे नजीकच्या भविष्यकाळात जगाला मान्य करावे लागेल अशीच सर्व परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे.
जगातील कागदी चलनांवरील विश्वास कमी होत चालला म्हणून बीटकॉईन हे 2009 साली जगात अवतरलेले आभासी चलन आहे. अशी ‘सतराशे साठ’ चलने असून त्याला कोणत्याच निर्मितीचा आधार नाही. म्हणजे त्यांचे एकूण मूल्य किती आहे, ते कोण निर्माण करतात, त्यांचे जगात किती व्यवहार होतात, त्यात कोण गुंतवणूक करीत आहेत, त्याच्या किमती इतक्या कमी अधिक का होतात एवढ्या सर्व गोष्टी गुलदस्त्यात आहेत, पण एवढे सर्व असूनही त्यांचे अस्तित्व जगात एक तप टिकले आहे. केवळ टिकलेच नाही, तर दर सेकंदाला ते नवनव्या गुंतवणूकदारांना भुरळ घालत आहे.
गेल्या आठवड्यात बुधवारी बीटकॉईनने पुन्हा 30 ते 40 टक्के बुडी मारली. त्याला कोणतेही कारण पुरते. फेब्रुवारीमध्ये टेस्ला कंपनीचा मालक आणि जगात पहिल्या दुसर्या क्रमांकाचा उद्योगपती इलॉन मस्क याला बीटकॉईनची भुरळ पडली. त्यामुळे त्याच्या कंपनीने त्यात गुंतवणूक केली. त्यानंतर हे चलन चर्चेत आले आणि त्याचे दर प्रचंड वाढले होते. आश्चर्य म्हणजे त्यानंतर काही दिवसांतच त्यानेच ट्विट करून बीटकॉईन जरा जास्तच महाग झाल्याची तक्रार केली आणि बीटकॉईनचे दर काही प्रमाणात कोसळले होते. बीटकॉईनचे मायनिंग करण्यासाठी जरा जास्तच ऊर्जा खर्च होते असा शोध त्याला अलीकडे लागला आणि त्याने त्याच्या कंपनीच्या गाड्या बीटकॉईनने विकण्याचा निर्णय फिरविला आणि बीटकॉईनने मोठी बुडी मारली. अशा अनेकही काही घटना घडल्या, पण हे आभासी चलन किती कचकवड्याचे असू शकते याची प्रचिती जगाला आली.
बीटकॉईनचा बोलबाला का वाढला हे जगजाहीर आहे. त्याचे कारण त्यात होणारे ट्रेडिंग आहे. बसल्या जागी पैसा मिळणार असेल, तर जग काहीही मान्य करण्यास तयार आहे असा याचा अर्थ होतो. त्यातून जगाचे सर्व आर्थिक व्यवहार संकटात सापडू शकतात याच्याशी कोणाला काही देणेघेणे नाही. आभासी चलनाचा वापर भविष्यात वाढणार आहे हे हेरून हे चलन जगात अवतरले. ते कोणा सरकारने आणलेले नाही, ते आणले तंत्रज्ञांनी. तो कोण होता हेही नीट कोणी सांगू शकत नाही, पण त्याने काही संगणकीय गणिते करून ठेवली आणि ती सोडवून तंत्रज्ञ ‘बीटकॉईनचे कारखाने’ चालवत आहेत. कारखान्यात माल तयार होतो, तर तो खपलाही पाहिजे. त्यासाठी एक साखळी तयार झाली. अतिलोभी माणसांची जगात काही कमी नाही. त्यांना मदतीला घेऊन ती तयार झाली. या साखळीत नवनवे गुंतवणूकदार येत राहतात आणि जे सुरुवातीला आले होते ते बक्कळ नफा मिळवून बाहेर पडत राहतात. आज जगातील बहुतांश आर्थिक उत्पादने अशीच आहेत हे मान्य केले तरी शेअर बाजार, मनी मार्केट, कमोडिटी मार्केटवर काही बंधने आहेत. सरकार त्याविषयीचे नियम निश्चित करू शकते, पण बीटकॉईनचे तसे काही नाही. त्यामुळे ज्यांच्यापर्यंत हे वारे उशिरा पोहचते आणि ज्यांना अव्वा की सव्वा परताव्याची हाव निर्माण होते ते गुंतवणूकदार त्यात सापडतात. ते मोठ्या आर्थिक हानीचे बळी ठरतात. गेल्या आठवड्यात नेमके तेच झाले. मस्कमुळे बीटकॉईनकडे नव्या गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी त्यात प्रवेश केला. आता बीटकॉईनने बुडी मारल्यामुळे असे नवे गुंतवणूकदार पोळून निघाले आहेत.
आपण पूर्वीच एका लेखात (बीटकॉईनच्या ऐका हाका, पण सावधान, घाईने घेऊ नका!- मार्च 2021) पाहिल्यानुसार बीटकॉईन कितीही आकर्षक वाटत असले तरी त्याच्या मायबापांचा शोध लागल्याशिवाय त्यात गुंतवणूक करणे टाळलेच पाहिजे.
बीटकॉईनचे गौडबंगाल!
जगातील एक टक्का लोकांकडे बीटकॉईनची 99 टक्के संपत्ती आहे. बीटकॉईनच्या किमती वाढल्या की हे लोक त्यातून टप्प्याटप्प्याने बाहेर पडत असावेत.
बीटकॉईनची पहिली लाट – 2010 – जेव्हा बीटकॉईन खूपच कमी लोकांना माहीत होते. दुसरी लाट – 2014 – जेव्हा विशेषतः अमेरिकेतील आर्थिक संस्थांनी बीटकॉईन खरेदी-विक्रीत उडी घेतली आणि तिसरी लाट – 2017 – जेव्हा गोल्डमन सॅचेसारख्या मोठ्या संस्थेने यात उडी घेतली आणि जपान सरकारने बीटकॉईनच्या व्यवहारांना मान्यता दिल्याने जगभरातील लोक बीटकॉईनचे व्यवहार करू लागले. त्यामुळे बीटकॉईनच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. फेब्रुवारीत इलॉन मस्कने गुंतवणूक करून त्याच्या चौथ्या लाटेला जन्म दिला आणि त्यानेच यू टर्न घेतल्यामुळे त्याच्या किमती गेल्या आठवड्यात कोसळल्या.
बीटकॉईनसारखी अनेक आभासी डिजिटल चलने जगात अवतरली असून ती दररोज उलाढालीचे उच्चांक प्रस्थापित करीत आहेत. त्यात न्यूयॉर्क कॉईनसारखी 11 चलने आघाडीवर आहेत. 10 हजार रुपयांचे सात दिवसांत 11 लाख रुपये झाल्याचीही काही उदाहरणे आहेत.
चीनमध्ये बीटकॉईनचा बोलबाला खूपच वाढला होता, पण सरकारने हे व्यवहार बेकायदा ठरविल्यानंतर आता व्यवहार कमी झाले आहेत.
एकूण दोन कोटी 10 लाख बीटकॉईन निर्माण होणार असून त्यासाठी 2140 साल उजाडेल असे मानले जाते. कारण 12.5 बीटकॉईन माईन करण्यासाठी अंदाजे 10 मिनिटे लागतात. सध्या 1.67 कोटी बीटकॉईन व्यवहारात आहेत असे मानले जाते.
बीटकॉईनचा एक व्यवहार करण्याचा खर्च सुरुवातीस 30 सेंट इतका कमी होता. तो आता 7.30 डॉलर म्हणजे साडेपाचशे रुपये झाला आहे. अर्थात त्यावर जी ऊर्जा खर्च करावी लागत आहे, तिच्यामुळे जगासमोर अनेक आव्हाने उभी राहू शकतात.
-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com