विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असून, सर्वच पक्षांचे उमेदवार आपल्या विजयासाठी मतदारराजाला साकडे घालताना दिसत आहेत. समाजाप्रति आपण व आपल्या पक्षाने काय योगदान दिले, हे सांगत पुढील पाच वर्षे सेवेची संधी देण्याचे आवाहन उमेदवारासह सहकारी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते करीत आहेत. यात पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांची कामगिरी सरस आहे. त्यांनी उत्तुंग विकासकामांच्या जोरावर रायगड जिल्ह्यासह राज्यात स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सिडको महामंडळाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष असलेले आमदार प्रशांत ठाकूर यंदा तिसर्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पनवेलचे नगराध्यक्षपद भूषविल्यानंतर सन 2009मध्ये त्यांनी पहिल्यांदा पुनर्रचित पनवेल विधानसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजय प्राप्त केला होता. शेतकरी कामगार पक्षाची 52 वर्षांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा भीमपराक्रम त्यांनी केला. यश मिळाले की बरीच नेतेमंडळी हवेत जातात आणि ज्यांनी आपल्याला निवडून दिले त्या मतदारांना सोयीस्कररीत्या विसरतात, पण आमदार प्रशांत ठाकूर त्याला अपवाद आहेत. त्यांनी जनता जनार्दनाला विकासाचे भरभरून दान दिले. शहरी पट्टा, सिडको वसाहती असो की ग्रामीण भाग प्रत्येक ठिकाणी या कार्यतत्पर लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून विकासकामे झाली. मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर. राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेलचा अनेक वर्षे अपेक्षित विकास होऊ शकला नव्हता. किंबहुना येथील विकासाला खीळ बसली होती. गावखेड्यांत तर परिस्थिती बिकट होती. तेथे बाकीच्या सुविधा सोडाच, पण साधे दळणवळणासाठी धड रस्तेही नव्हते. हे विदारक चित्र बदलण्यासाठी प्रशांत ठाकूर यांना आमदार व्हावे लागले. त्यांनी आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये 600 कोटींहून अधिक रुपयांची कामे करून पनवेलच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढला.
टोलच्या ज्वलंत बनलेल्या मुद्द्यावरून आमदार प्रशांत ठाकूर यांनी 2014 साली काँग्रेस पक्षातून भाजपत प्रवेश केला आणि पनवेलमध्ये नव्या पर्वाला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला शब्द खरा करून खारघर-कामोठे टोलनाक्यातून पनवेल परिसरासह संपूर्ण राज्यातील छोट्या वाहनांना टोलमुक्ती दिली. पुढे वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात होणार्या नागरीकरणामुळे नागरी सोयीसुविधा पुरविण्यासाठी पनवेल नगर परिषदेवर ताण पडू लागला. ते लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका व्हावी, ही नागरिकांची आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यासाठी त्यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला, तसेच न्यायालयीन लढाही दिला. त्याला यश येऊन राज्य शासनाने 1 ऑक्टोबर 2016 रोजी पनवेल महापालिकेची स्थापना केली. या महापालिकेच्या पहिल्यावहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने विरोधकांना चारीमुंड्या चीत करून एकहाती सत्ता प्राप्त केली. त्यानंतर विकासाचा पुढचा टप्पा महापालिका क्षेत्र व्यापतोय. तेथे अनेक विकासकामे नियोजित असून, त्यापैकी काही कामांचा शुभारंभदेखील झाला आहे. पनवेल स्मार्ट सिटी करण्यात महापालिकेची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पनवेल शहर व परिसर विस्तारून त्याचे नगरातून महानगरात रूपांतर होत असताना समस्यांचा रेटाही वाढला. या समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार या नात्याने प्रशांत ठाकूर अहोरात्र झटत आहेत. आमदारकीबरोबरच सिडको महामंडळ आणि पक्षाचे जिल्हा अध्यक्षपद अशी तिहेरी जबाबदारी सांभाळताना त्यांची प्रचंड धावपळ होते. अशा वेळी त्यांना कुटुंबाला वेळ देता येत नाही, शिवाय कधी कधी स्वत:कडेही दुर्लक्ष होते, परंतु त्यांची जनतेशी नाळ कायम आहे. मार्गात कितीही अडथळे आले आणि कुणीही अपशकून केले तरी ‘अनंत अमुचि ध्येयासक्ती…’ या निर्धाराने ते दररोज 16 ते 18 तास कार्यरत असतात. म्हणूनच ते सदैव यशस्वी होतात. स्वच्छ चारित्र्य, निष्कलंक प्रतिमा, विकासाची दूरदृष्टी, अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी वडील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घालून दिलेल्या समाजकारणाच्या पायावर कळस रचला आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, कला, क्रीडा, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा वावर असतो. विशेष म्हणजे आपल्याकडून जे जे काही समाजाला देता येईल ते देण्यासाठी ते तत्पर असतात.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जशी एकामागून एक शतके करीत आहे, तसे आमदार प्रशांत ठाकूर एकापाठोपाठ एक विकासकामे करीत असतात. त्यांच्या कार्याचा संपूर्ण लेखाजोखा द्यायचा झाल्यास प्रबंध तयार होईल. त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती पनवेलची सूज्ञ जनता याही वेळी त्यांना मतदानातून निश्चितपणे देईल आणि विधानसभा निवडणुकीत ते विजयाची हॅट्ट्रिक साधतील, हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज नाही.
-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)